मुंबई - 'तुला पाहते रे' ही मालिका तुम्हाला आठवते का? त्यातली ती गोड मुलगी इशा जिने अतिशय जिद्दीने सर्व संकटाना तोंड देत विक्रांत सरंजामेवर मात केली. याच मालिकेतील विक्रांत-इशाच्या प्रेमकहाणीने तरुणाईलाही वेड लावले होते. इशा निमकर म्हणजेच सगळ्यांची आवडती गायत्री दातार हिने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होत. पदार्पणातील तिच्या या भूमिकेने खूप लोकप्रियता मिळवली. ही गोड अभिनेत्री आता प्रेक्षकांना 'झी युवा' वाहिनीवर एका वेगळ्या रुपात आपल्याला भेटणार आहे. लवकरच सुरू होणाऱ्या 'युवा डान्सिंग क्वीन' या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शोद्वारे गायत्रीच्या व्यक्तिमत्त्वातील नृत्य कौशल्य प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
तसं पाहता गायत्रीने याआधी कधीच डान्स रिऍलिटी शोमध्ये भाग घेतलेला नाही. मात्र जेव्हा तिला वेस्टर्न, फोक, क्लासिकल आणि अजून वेगवेगळे डान्सफॉर्म सादर करण्याची संधी 'युवा डान्सिंग क्वीन' या शोद्वारे मिळणार असल्याचं कळलं तेव्हा मात्र तिने लगेच तिने या स्पर्धेत भाग घ्यायला होकार दिला. गायत्री या कार्यक्रमात प्रेक्षकांना लोकनृत्य आणि कंटेम्पररी डान्स फॉर्म्सवर थिरकताना दिसणार आहे. टीव्हीवर दिसलेली ही अत्यंत लाघवी आणि गोड मुलगी आता आपल्याला नृत्याच्या रंगमंचावर बहारदार नृत्याने प्रेक्षकांना भूरळ घालताना पहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात तिच्याबरोबर नावाजलेल्या अनेक सेलेब्रिटी डान्सर पाहायला मिळतील. सौंदर्य आणि अदाकारीने ठासून भरलेल्या या सौंदर्यवती जेव्हा 'युवा डान्सिंग क्वीन' च्या रंगमंचावर थिरकतील तेव्हा ऐन थंडीतही नृत्याची बिजली कडाडल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की.