मुंबई - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. अर्थातच 'सिंधू..एका सामान्य मुलीची असामान्य गोष्ट' या मालिकेचा सेटही त्याला अपवाद नाही! विशेष म्हणजे यानिमित्त एकोणिसाव्या शतकात गणेशोत्सव कसा साजरा केला जायचा, हे यानिमित्त छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इतकेच नाही तर गणेशोत्सवादरम्यान कथेत एक रंजक ट्विस्टही येणार आहे. सिंधू ही मालिका फक्त मराठी वाहिनीवर रात्री ८ वाजता प्रसारित होत असते.
प्रत्येक घराघरामध्ये जशी गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे, तसेच काही वातावरण सिंधूच्या सेटवर आहे. कथानकानुसार सिंधूचे अलीकडेच लग्न झल्यामुळे तिचा हा सासरी पहिला गणेशोत्सव असेल. यानिमित्त ती हरितालिकेच्या व्रताचीही तयारी करताना दिसत आहेत. हरितालिकेचे हे व्रत आपल्या पतीसाठी केले जात असल्यामुळे या व्रताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या कुटुंबात सुख, शांती नांदावी यासाठी महिलांतर्फे भगवान शंकराकडे साकडे घातले जाते. अगदी जुन्या काळापासून सौभाग्यप्राप्तीसाठी आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी अनेकजणी हे व्रत निर्जळी किंवा उपाशी राहून करताना दिसतात. त्यामुळे चिमुकली सिंधुदेखील हे हरतालिकेचे व्रत करताना मालिकेत दिसेल.