गणपती बाप्पाच्या आगमनाची वेळ जवळ येऊ लागताच मुंबई आणि इतर प्रदेशातील चाकरमानी कोकणाकडे धाव घेताना दिसतात. कोकणच्या पार्श्वभूमीवरील टेलिव्हिजन मालिकांनाही प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘गाव गाता गजाली’ या मालिकांमुळे प्रेक्षकांना कोकणच्या सौंदर्याने अधिक भुरळ घातली आणि हे कोकण ज्यांचा नजरेने टिपलं ते कॅमेरामन गणेश कोकरे. सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत सेट वर हसत खेळत अनेक दृश्य टिपणाऱ्या गणेश कोकरे यांनी कोकणातल्या गणेशोत्सवाचं चित्रीकरण करताना असाच एक आगळा वेगळा प्रयोग केला.
कोकणातली परंपरा असणाऱ्या फुगड्या चित्रित करताना छाया चित्रकार गणेश कोकरे ह्यांनी एका हातात कॅमेरा आणि तर दुसऱ्या हाताने कलाकारांसोबत फुगडी घालून चित्रीकरण केलं. ज्यामुळे उत्तम चित्रीकरण झालंच शिवाय एक वेगळा अनुभव, वेगळा आनंद सगळ्यानाच मिळाला आणि हा आनंद प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे ‘रात्रीस खेळ चाले ३’ च्या गणपती विशेष भागात.