बडवानी (मध्य प्रदेश)- मध्य प्रदेशातील बडवानी येथे टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ताविरोधात शुक्रवारी एफआयआर नोंदविण्यात आली. फिर्यादी मनीष सांखले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये दत्ता यांनी जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप केला आहे.
सोमवारी, टेलिव्हिजन अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी करणाऱया हॅशटॅगने ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरुवात केली. नेटिझन्सने तिच्या ताज्या यूट्यूब व्हिडिओमध्ये जातीवादी शब्द असल्याचे म्हटले आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील बबिताच्या भूमिकेसाठी प्रसिध्द असलेल्या मुनमुनने झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.
व्हिडिओमध्ये, मुनमुनने आपल्या मेक अपबद्दल बोलताना आपल्याला घाण दिसायचे नाही असे म्हणताना एका समुदायाच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्या समुदायाचा उल्लेख झाला त्यांनी देशभर यावर प्रतिक्रिया दिली. अनेक ठिकाणी मुनमुनला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली. अनेक ठिकाणी सध्या कोरोनाचा काळ असतानाही निदर्शने झाली. मुनमुनने आपली चुक झाल्याचे मान्य करीत अनावधानाने हे घडल्याचे सांगत दिलगीरी व्यक्त केली आहे. तिने माफीचे निवेदन आपल्या सोशल मीडियावरुन प्रसिध्द केलंय.
बोलण्याच्या ओघात हा शब्द तोंडून गेला. कुणाच्याही भावना दुखवण्याचा, अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे तिने ट्विटरवर म्हटले आहे.