मुंबई - अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज देशाचा 'फॅमिली मॅन' ऊर्फ श्रीकांत तिवारीच्या पुनरागमनाचा लक्षवेधक ट्रेलर सादर केला आहे. मनोज वाजपेयी यांनी ही भूमिका साकारली आहे. या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सिरीजच्या ९ भागांच्या नवीन सीझनमध्ये श्रीकांत मध्यमवर्गीय फॅमिली मॅन व जागतिक दर्जाचा गुप्तचर अशा दुहेरी भूमिका साकारताना आणि देशाचे घातक हल्ल्यापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे. रोमांचपूर्ण ट्विस्ट्स आणि अनपेक्षित क्लायमॅक्स असलेल्या या ऍक्शन-ड्रामाने भरलेल्या सिरीजचा आगामी सीझन श्रीकांतच्या दुहेरी विश्वांची लक्षवेधक झलक दाखवेल.
ट्रेलर सादरीकरणाबाबत बोलताना अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या इंडिया ओरिजिनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित म्हणाल्या, ''आमची पात्रं घराघरांमध्ये लोकप्रिय बनत आहेत, यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही. वैशिष्ट्यपूर्ण फॅमिली मॅन श्रीकांत तिवारीला मिळालेले प्रेम व प्रशंसा उत्तम, वास्तववादी कथा सर्व मर्यादांना मोडून काढण्याबाबत असलेल्या आमच्या विश्वासाला अधिक दृढ करतात. 'दि फॅमिली मॅन'चा नवीन सीझन अधिक रोमांचक, अधिक जटिल आणि अधिक ऍक्शनने भरलेला आहे. आम्हाला विश्वास आहे की, प्रेक्षक श्रीकांत आणि त्याच्या प्रतिस्पर्धीमधील आमना-सामना पाहण्यासाठी खूपच उत्सुक असतील. अमेझॉनमधील आम्हा सर्वांसाठी भारतातील, तसेच भारताबाहेरील प्रेक्षकांशी संलग्न होणा-या सर्वोत्तम कन्टेन्टला सादर करण्याचा क्षण अत्यंत आनंददायी आहे आणि आम्ही पुढील महिन्यामध्ये शोचा नवीन सीझन सादर करण्यासाठी खूपच उत्सुक आहोत.''