महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 4, 2021, 7:49 PM IST

ETV Bharat / sitara

४०० वा प्रयोग साजरा करताना 'एका लग्नाची पुढची गोष्ट'चा ‘लग्नाळू आठवडा'!

एका लग्नाची गोष्ट हे नाटक खूप गाजलं होतं व आता त्याचा सिक्वेल परंतु वेगळ्या कहाणीसह ‘एका लग्नाची पुढची गोष्ट' रंगमंचावर आलं व अपेक्षेप्रमाणे तुफान गर्दीत सुरु होतं. रसिक मायबापानं दिलेल्या प्रेमाच्या बळावर 'एका लग्नाची पुढची गोष्ट' हे नाटक येत्या १४ मार्चला ४०० प्रयोगांचा टप्पा गाठण्यात यशस्वी होणार आहे.

Eka Lagnachi Pudhachi Goshth
एका लग्नाची पुढची गोष्ट'

मुंबई - लॉकडाऊनमध्ये सर्वच चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंद होती. चित्रपटगृहे सुरु झाली तरी नाट्यगृहे सुरु होण्यास उशीर झाला. अनुदान, नाट्यगृह भाडे आदींमुळे उशीर झाला व त्यामुळे निर्माते, कलाकार आणि खासकरून बॅकस्टेज कामगार यांच्या आर्थिक परिस्थितीत फरक पडला. परंतु मराठी रंगभूमीला वाहून घेतलेले आजच्या पिढीतील नट असं ज्यांचं यथार्थ वर्णन प्रत्येक मराठी माणूस अभिमानानं करतो त्या प्रशांत दामलेंच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या सदाबहार नाटकाचे प्रयोग ‘कोरोना’ जोमात असतानाही झाले. किंबहुना त्यांनीच पुढाकार घेत इतरांना मार्ग दाखविला. रसिक मायबापानं दिलेल्या प्रेमाच्या बळावर 'एका लग्नाची पुढची गोष्ट' हे नाटक येत्या १४ मार्चला ४०० प्रयोगांचा टप्पा गाठण्यात यशस्वी होणार आहे.

एका लग्नाची गोष्ट हे नाटक खूप गाजलं होतं व आता त्याचा सिक्वेल परंतु वेगळ्या कहाणीसह ‘एका लग्नाची पुढची गोष्ट' रंगमंचावर आलं व अपेक्षेप्रमाणे तुफान गर्दीत सुरु होतं. या नाटकाची कथा इम्तियाज पटेल यांनी लिहिली असून, संहिता व दिग्दर्शन अद्वैत दादरकरनं केलं आहे. मराठी रंगभूमीवरील प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर ही सदाबहार जोडी आणि त्यांची ‘ऑनस्टेज’ केमिस्ट्री 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचं खरं वैशिष्ट्य आहे. रिपीट ऑडीयन्सने या नाटकाला खऱ्या अर्थानं आपल्या मनात स्थान दिलं आहे. परंतु कोरोना महामारीमुळे प्रयोग करता येऊ न शकलेली ही खुमासदार आणि खुसखुशीत गोष्ट रसिकांनी इतकी डोक्यावर घेतली की, लॅाकडाऊननंतर पहिला प्रयोग 'हाऊसफुल्ल’ करत त्यांनी प्रशांत दामलेंवरील प्रेमाची जणू पोचपावतीच दिली.

प्रशांत दामले फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, सरगम प्रकाशित, झी मराठी प्रस्तुत 'एका लग्नाची पुढची गोष्ट'च्या पुढील प्रयोगांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यात ६ मार्च ते १४ मार्चपर्यंत 'लग्नाळू आठवडा' म्हणून घोषित करण्यात आला आहे. 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकानं मिळवलेलं हे यश रसिकांनी आमच्यावर केलेल्या प्रेमाचं प्रतीक असल्याची भावना प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे.

‘लॉकडाऊननंतर जेव्हा या नाटकानं मराठी रंगभूमीचा पडदा उघडला तेव्हाही रसिकांनी मनापासून प्रेम करत गर्दी करणं ही या नाटकाची पुण्याई आहे. आज आम्ही ४०० व्या प्रयोगापर्यंत पोहोचलो आहोत. पुढे आणखी मोठी मजल मारायची आहे. तेव्हाही रसिकांची अशीच साथ मिळेल’, असे प्रशांत दामले व्यक्त होत म्हणाले. ४०० व्या प्रयोगाला प्रमुख पाहुणे कोण असं विचारता ते गुपित आहे पण तुमच्यासाठी सुखद धक्का असेल, असं ते म्हणाले.

रसिकांचे प्रेम व आशीर्वादामुळे 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाने ४००व्या प्रयोगाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details