सिंधुदुर्ग- रात्रीचा राजा आणि दिवसा डोकीवर बोजा अशी तळ कोकणात दशावतारी कलावंतांबाबत एक महान रूढ आहे. गेली कित्तेक शतकांची कला जोपासणारे हे कलाकार दशावताराच्या सादरीकरणावेळी रंगमंचावर तालबद्ध अशी लढाई सादर करतात तेव्हा रसिक त्यांना जोरदार अशी दाद देतात. मात्र या कलाकारांची सध्या आपल्या पोटाशीच लढाई सुरु आहे आणि या लढाईत ते एकटे पडले आहेत. शासनाकडे हे कलाकार मदतीची अपेक्षा करत आहेत. कोरोनामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आलीं आहे.
जिल्हात आहेत शंभर पेक्षा जास्त मंडळे
कोरोनाच्या महामारीमध्ये सिंधुदुर्गातला दशावतार कलाकारावर उपासमारीची वेळ आलीय. लॉकडाउनमुळे होणारे प्रयोग रद्द झालेत जिल्ह्यात शंभर पेक्षा जास्त दशावतार मंडळ आहेत. यामध्ये सहा हजार पेक्षा जास्त कलाकार आहेत. सरकारने "ब्रेक दी चेंज" म्हणत लॉक डाऊन लागू केले, पण मात्र कोकणातली दशावतार कलाकारांवर रस्त्यावर येण्याची वेळ त्यामुळे आलीय. इतर घटकांना सरकारने पॅकेज लागू केलं आहे. पण यामध्ये दशावतार कलाकार कूठेच दिसत नाही. अनेक कलाकारांच्या घरातील सदस्य आजारी आहेत. त्यांना डॉक्टरकडे जाण्यासाठी पैसे नाहीत. नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यत दशावतार कलाकार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावा-गावात जाऊन आपली कला दाखवत असतात. त्यामधून मिळणाऱ्या मानधनातुन आपलं वर्षभराचा गाडा चालवत असतात.
लॉक डाऊनमुळे मजुरीही मिळत नाही - आप्पा दळवी
दशावतार कंपनीचे मालक आप्पा दळवी सांगतात, या कलेला ८०० वर्षाची परंपरा आहे. दार वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला दशावतारी नाटकाला सुरवात होते. मार्च पासून मुख्य हंगाम चालू होतो. मी महिन्यात हंगाम संपतो. याच कलेवर या कलावंतांचे पोट अवलंबून असते. मात्र गेल्यावर्षीपासून सातत्याने लागणाऱ्या लॉक डाऊनमुळे आमचे प्रयोग रद्द झालेत त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. तर या लॉक डाऊनमुळे मजुरीही मिळत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आर्थिक पाठबळ मजबूत नसलेला दुर्बल असा हा कलाकार वर्ग - ओमप्रकाश चव्हाण
दशावताराच्या मंचावर स्त्री पार्ट हुबेहूब वटवणारे ओमप्रकाश चव्हाण सांगतात, दशावतारी कलाकार म्हणजे ग्रामीण भागातील आपली तुटपुंजी शेती सांभाळून कला सादर करणारा हा कलाकार. आर्थिक पाठबळ मजबूत नसलेला दुर्बल असा हा कलाकार वर्ग. साधारण नोव्हेंबर ते मी या काळात आपली कला सादर करून तुटपुंज मानधन मिळवायचं आणि त्यावर पुढचे ५ महिने आपण आणि आपलं कुटुंब सांभाळायचं हि त्याची रोजनिशी चालू असते. दुर्दैव म्हणजे या पारंपरिक कलेच्या मागे भक्कम असा एकही माणूस उभा राहिलेला नाही. हि अत्यंत खेदाची गोष्ट आहे. लोकप्रतिनिधींनी या कलावंतांना त्यांचं कुटुंब जगवता येईल यासाठी गांभीर्याने काहीतरी करावे. असेही ते यावेळी म्हणाले.