गडचिरोली - देशभर दिवाळी साजरी होत असली तरी मोलमजुरी करणाऱ्या शेतमजूर, कष्टकरी वर्गाला विशेषतः आदिवासी बांधवांना अजूनही अंधाराने ग्रासले आहे. शिक्षण, आरोग्य आणि इतर जीवनावश्यक बाबींपासून हा समाज कोसो मैल दूर आहे. छत्तीसगडमधील एका वयोवृध्द महिलेचा हात मोडला. कुठेही दवाखाना नाही. अशावेळी या माऊलीने गाठले चक्क लोकबिरादरीचा हेमलकसा येथील रुग्णालय.
डॉ. प्रकाश आमटेंची अनोखी 'भाऊबीज'! - Dr. Prakash Aamte celebrate different Diwali
हात मोडलेली छत्तीसगडची आजी दूरवर असलेल्या हेमलकसा येथे उपचारासाठी पोहोचली. डॉ. प्रकाश आमटे यांनी मायेने विचारपूस करीत तिची सेवा केली.
या वयोवृध्द महिलेने यासाठी किती कष्ट घेतले याबद्दलची एक पोस्ट अनिकेत आमटे यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिलंय, ''छत्तीसगड येथील घनदाट अरण्यात डोंगरावर असलेल्या मेट्टा वाडा गावातील ही आज्जी 4 दिवसांपूर्वी घरीच पडली. हाताचे हाड मोडले. आपल्या मुला सोबत20 किलोमीटर चालत आणि नंतर 20 किलोमीटर बसचा प्रवास करून हेमलकसा येथील लोक बिरादरी दवाखान्यात आली. अतिशय खडतर जीवन आहे. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची गेली 45 वर्ष अखंडित सेवा सुरू आहे. लोक बिरादरी प्रकल्पाच्या अशा लाखो उपेक्षीत रुग्णांनी या दवाखान्याचा लाभ घेतला आहे🙏भाऊबीज.''
आदिवासी समाजाला या मुलभूत सुविधा कधी मिळणार हा खरा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. भारत जगात सर्वात बलशाली होण्याची स्वप्न पाहात असला, तशी स्वप्ने राज्यकर्ते जनतेला दाखवत असले तरी प्रत्यक्ष यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत याची लाखो उदाहरणे सापडतात. देश स्वतंत्र झाला असला तरी अजूनही हा समाज अंधकारात जगतो आहे. यातून तो मुक्त होईल अशी धोरणे सरकार राबवेल अशीच अपेक्षा या दिवाळीत सरकारकडून बाळगूयात.