कोल्हापूर - वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून आपण सर्वजण दिपावलीकडे पाहतो. आपला हा धार्मिक उत्सव आहे. प्रकाशाचा हा उत्सव आपल्याला आनंद देणारा उत्सव आहे. याच्यामागे हाजारो वर्षांची परंपरा आहे हे आपण विसरूनच गेल्याचं हल्ली जाणवत आहे. कालानुरूप दिपावली साजरी करण्याच्या पद्धती आणि त्याचे स्वरूप बदलत चालले आहे. त्यामुळे खरंच पूर्वीची 'ती' दिपावली हरवत चालली आहे का ? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा यावरचाच हा विशेष रिपोर्ट...
दिवाळी म्हंटले की, उठण्याने अंघोळ, फटाके, नवे कपडे, फराळ, रांगोळी आणि बरंच काही :
परंपरा या परिवर्तनशील आहेत. काळाबरोबर त्या बदललेल्या आहेत. असे असले तरी भावना त्याच असतात. मात्र या बदलत्या डिजिटल युगात त्यातील अप्रुप सुद्धा निघून गेले आहे. पूर्वी दिवाळी म्हंटले की, सर्वांना याची उत्सुकता असायची. लहान मुलांना तर याचे विशेष आकर्षण, कारण वर्षातून एकदाच दिवाळीला नवीन कपडे आणि फटाके मिळायचे. दिवाळीला पहाटे 5 वाजता उठून कडाक्याच्या थंडीत चुलीवरील गरम पाण्याने अंघोळ. विशेष म्हणजे सुवासिक तेल आणि सुगंधी उठण्याने घातलेली ही अंघोळ नेहमीच लक्षात राहण्यासारखी असायची. घरातील महिला दिवाळीच्या आदल्या दिवशीच अंगण शेणाने सारवून चकाचक करायच्या. दिवाळी दिवशी या अंगणात ठिपक्यांची आकर्षक रांगोळी काढली जायची. रांगोळी काढून झाल्यावर लगेचच लहान मुलांना त्यासाठी हा सण सर्वाधिक आवडतो त्या फटाक्या वाजायला सुरुवात व्हायची. या सर्वांमध्ये एक गोडवा आणि त्याचबरोबर परंपरा सुद्धा पूर्वी लोकं जपत होती. आजही अनेकजण या रूढी परंपरानुसार दीपावली साजरी करतात. मात्र त्यातील उत्साह आणि ती मजा आता राहिली नाहीये. धावपळीच्या युगात केवळ सण म्हणून आणि लोकं दिवाळी साजरी करतायेत म्हणून आपणही केली पाहिजे असे अनेकांच्या घरी पाहायला मिळत आहे.
आठवडाभर आधी फराळ करण्यात गुंतलेले हात आता दिसत नाहीत :
पूर्वी दिपावलीच्या आधी एक दोन आठवडे आधीपासूनच फराळ करण्यासाठी घरातील महिलांचे हात गुंतलेले पाहायला मिळायचे. आजही काही ठीकाणी हे पाहायला मिळत आहे. मात्र बदलत्या काळानुसार अनेकजण तयार फराळाकडे जास्त वळले आहेत. पूर्वी गल्लीतील सर्व महिला मिळून एकमेकींच्या घरातील फराळ बनवायचे. त्यामध्ये एक वेगळी मजा असायची. आता मात्र ती मजा पूर्णपणे हरवत चालली असून शहरात तर पाहायला सुद्धा मिळत नाहीये. विशेष म्हणजे आपण केलेले दीपावलीचे गोडधोड पदार्थ नातेवाईकांना द्यायला जाणे त्यांच्याकडूनही ते प्रेमाने येणे हे आता राहिले नसून त्यांनी दिवाळीचा फराळ पाठवला आहे आता आपणही पाठवला पाहिजे. नाही पाठवला तर ते काय म्हणतील ? अशा पद्धतीची व्यवहारिकता सद्या आली असून तो आपलेपणा हरवला आहे.