हैदराबाद - राजकीय समारंभ, सोहळे, लग्न समारंभ फार गर्दीमध्ये कोणत्याही समस्येविना सुरू असतात. मात्र, आमच्यासारख्या कलावंतांना खूप निर्बंध असतात. 50 टक्के प्रेक्षकांमध्ये काम करावं, हे निर्बंध विनोदी आहेत, असं माझं मत आहे. कारण नाटकाला येणारा प्रेक्षक, चित्रपटाला येणारा प्रेक्षक कलाकाराला भेटत नाही. पण असं म्हणतात की, तुम्ही इतका वेळ एसीमध्ये बसतात, तेव्हा तो कोरोना होऊ शकतो. तर मग विमानात बसलेल्या लोकांना कोरोना होऊ शकतो ना. त्यामुळे सोयीस्कर रीतीने हे मांडलं गेलंय की कोणी काम करायचं आणि कोणी नाही, असे मत दिग्दर्शक केदार शिंदे ( Director Kedar Shinde on Corona Guidelines ) यांनी व्यक्त केलं. प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेता अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे मराठीतील नामवंत दिग्दर्शकांपैकी एक केदार शिंदे. केदार शिंदे हे दिंवगत शाहीर कृष्णराव साबळे यांचे नातू आहेत. केदार शिंदे यांनी श्रीमंत दामोदर पंत, अगं बाई अरेच्चा, इराद पक्का, बकुळा नामदेव घोटाळे, जत्रा यासारख्या चित्रपटांचं तर सही रे सही, पुन्हा सही रे सही, तूतू मीमी, श्रीमंत दामोदर पंत या मराठी नाटकाचं, इतकंच नव्हे तर एका हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ईटीव्ही भारतने त्यांच्या वाढदिवसाच्या (16 जानेवारी) निमित्ताने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. ( Director Kedar Shinde Special Interview with ETV Bharat )
- प्रश्न - सर सध्या कोणत्या प्रोजक्टवर काम सुरुंय?
उत्तर -सध्या मिनी लॉकडाऊन सुरू आहे. माझ्या आयुष्यातील लॉकडाऊन 2020 साली सुरू झाला. जेव्हा जेव्हा नवीन प्रोजक्ट हाती घेतले जातो. तो सुरू होणार असतो, तेव्हाच कोरोनाचं संकट समोर येतं. यानंतर राजकीय स्तरावरुन आपल्यावर निर्बंध घातले जातात आणि मी फक्त एक सामान्य नागरिक म्हणून त्याकडे हताशपणे बघतो. 100 टक्के स्वत:ची काळजी घेतोय. कोरोना नाही असं माझं म्हणणं नाही. पण त्याचा अवडंबर फक्त मनोरंजन क्षेत्रापुरतं का? हे मला कळलेलं नाहीये. कारण राजकीय समारंभ, सोहळे, लग्न समारंभ फार गर्दीमध्ये कोणत्याही समस्येविना सुरू असतात. मात्र, आमच्यासारख्या कलावंतांना खूप निर्बंध असतात. 50 टक्के प्रेक्षकांमध्ये काम करावं, हे निर्बंध विनोदी आहेत, असं माझं मत आहे. कारण नाटकाला येणारा प्रेक्षक, चित्रपटाला येणारा प्रेक्षक कलाकाराला भेटत नाही. पण असं म्हणतात की, तुम्ही इतका वेळ एसीमध्ये बसतात, तेव्हा तो कोरोना होऊ शकतो. तर मग विमानात बसलेल्या लोकांना कोरोना होऊ शकतो ना. त्यामुळे सोयीस्कर रीतीने हे मांडलं गेलंय की कोणी काम करायचं आणि कोणी नाही. त्यामुळे राजकीय लोकांसाठी आमचं क्षेत्रं हे शेवटचं येतंय. त्यांचे निर्बंध आम्ही सहन करतोय आणि हताशपणे बघतोय की, कधी या गोष्टी पूर्वपदावर येतील. मला असं वाटतं की, कोरोनाबाबत जे तज्ञ आहेत, ज्यांना याबाबत माहिती आहे, त्यांच्यापैकी किती लोकांचे पैसे या क्षेत्रात अडकले आहेत, याचा एकदा शोध करण्याची गरज आहे. ज्यांचे पैसे अडकतात ना त्यांना याची जाणीव असते. या क्षेत्रातील अभ्यासू (माहीर) लोक मग ती कोणत्याही पक्षातील असू देत त्यांना सरकारने जवळ घेतले तर ते लोक खरं सांगू शकतील की मनोरंजन क्षेत्रातील लोकांच्या अडचणी काय आहेत. ( Director Kedar Shinde To Government on Corona Guidelines )
- प्रश्न - वैमानिक होण्याचं स्वप्न, सैन्यदलात जाण्याचं स्वप्न पाहिलं. मात्र, आज तुम्ही मनोरंजन क्षेत्रात आलात, दिग्दर्शक झालात, याबद्दल सांगाल.
उत्तर -मला बालपणी वैमानिक व्हावंसं वाटत होतं. त्यासाठी एनसीसी सहभागी झालो होते. एससीसीचा प्रमुखही होतो. आठवीला माझा विचार होता की, सैन्यशाळेत जायचं आणि तिथून हवाईदलात जाऊन वैमानिक व्हायचं. पण 'गवयाचं पोर सुरातच रडतं' त्याप्रमाणे शाहीर साबळेंचा नातू असल्यामुळे त्या कालखंडात आमच्या महाराष्ट्राच्या लोकधारा या कार्यक्रमात काही मुलांची आवश्यकता होती. त्यामुळे सुट्टींच्या दिवसांमध्ये केदार तू काही प्रयोग कर, असं सांगितल्यामुळे यात मी कसा अडकत गेलो, ते माझं मला कळलं नाही. वैमानिक असतो तर विमान चालवलं असतं. आज दिग्दर्शक आहे तरीही विमानच चालवतोय. कारण मी पायलट सीटवरच बसलेलो असतो आणि मी सर्व कलावंत माझ्या मागेच असतात, मी ज्या पद्धतीने त्यांना घेऊन जाईन ते त्या पद्धतीनेच जातात.
- प्रश्न - सर, तुम्ही तुमच्या आजोबांवर म्हणजे शाहीर साबळेंवर चित्रपट करताय. महाराष्ट्र शाहीर, हे या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार बद्दल सांगाल.
उत्तर -महाराष्ट्र शाहीर हे नाव असलं तरीही हा चित्रपट काही शाहीर साबळेंवरील डॉक्युमेंटरी नाही. हा सिनेमा अडीच तासांचा आहे. कालखंड 1923 ते 1984 यादरम्यानचा आहे. त्यांच्याशी माझं घरघुती नातं होतंच. मात्र, त्यांच्या गोष्टी काही Script करत होतो, त्या वाचताना मला जाणवायला लागलं, की या माणसानं काय-काय या महाराष्ट्रासाठी केलंय, हे लोकांसमोर आलंय. हे फक्त महाराष्ट्राची लोकधारा करणारे शाहीर नाहीत, फक्त जय जय महाराष्ट्र माझा म्हणणारे शाहीर नाहीत तर त्यांनी या महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय या सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान खूप मोठ्या प्रमाणावर दिलं होतं. ते योगदान काय आहे, ते मी 'महाराष्ट्राचा शाहीर' या सिनेमाच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. हा सिनेमा 2023मध्ये येईल. कारण या 3 सप्टेंबरपासून त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. त्यामुळे 2022 ते 2023 या काळात तो येईल. तो काळ उभा करण्यासाठी थोडा कठीण आहे. माझ्या स्वत:साठी ही चित्रपट Milestone चित्रपट असेल. मी आजपर्यंत जितके सिनेमे केलेत त्याच्यापेक्षा ही माझ्यासाठी फार महत्त्वाची फिल्म आहे. यानिमित्ताने आजोबांनी मला जे शिकवलं त्याचा उतराई होण्याचा प्रयत्न करेन. ( Director Kedar Shinde on Shahir Sable Movie )