मुंबई - बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांच्या प्रेमकथा मोठ्या रंजक आहेत. आपलं प्रेम मिळवण्यासाठी किंवा प्रेम करत असलेल्या व्यक्तीवर प्रभाव टाकण्यासाठी हे कलाकार काही ना काही शक्कल लढवताना दिसतात. अशीच एक सदाबहार जोडी म्हणजे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्याही प्रेमकथेचे बरेच किस्से आहेत. 'शोले' चित्रपटात दोघांचीही खास केमेस्ट्री पडद्यावर पाहायला मिळाली. मात्र, या चित्रपटातील एका सिनमध्ये हेमा मालिनी यांना मिठी मारण्यासाठी धर्मेंद्र यांनी खास ट्रिक वापरली होती.
मीडीया रिपोर्टनुसार, 1970 पासून हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या नात्याच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली होती. धर्मेंद्र हे आधीपासूनच विवाहित होते. त्यांचे प्रकाश कौर यांच्याशी लग्न झालेले होते. तसेच सनी आणि बॉबी ही दोन मुले देखील त्यांना होती. तरीही ते ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. सुरुवातीला हेमा मालिनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होत्या. त्यांना कोणत्याही विवाहीत पुरुषाच्या प्रेमात पडायचे नव्हते. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांना प्रपोज केल्यानंतर हेमा यांनी ते प्रपोजल नाकारले होते. त्यानंतर दोघांची जोडी 1975 साली प्रदर्शित झालेल्या 'शोले' चित्रपटात झळकली.