मीरा भाईंदर (ठाणे) - "व्हर्जिन भास्कर" या वेब सिरीजमध्ये अहिल्याबाई होळकर यांचा अपमान झाल्याचा दावा मिरा भाईंदर धनगर समाज एकीकरण समितीने केला आहे. एकता कपूर यांनी निर्माण केलेल्या "व्हर्जिन भास्कर" या सेक्सविषयक वेबसिरीजमध्ये राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव वापरून अवमान आणि समाजात रोष निर्माण केल्याप्रकरणी निर्माते -दिग्दर्शक यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच तात्काळ वेबसिरीज बंद करण्याची मागणी मिरा भाईंदर धनगर समाज एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीच्या वतीने नवघर पोलीस ठाण्यात निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
"व्हर्जिन भास्कर" वेबसिरीज बाबत धनगर समाज आक्रमक एकता कपूर आणि शोभा कपूर यांची मालकी असलेल्या बालाजी टेलीफिल्म्स या कंपनीने "व्हर्जिन भास्कर" (सीझन २) ही वेब सिरीज निर्माण केली असून ही सीरीज अल्ट बालाजी याही वाहिनीवरुन रिलीज झाली होती.
ही वेबसिरीज फक्त प्रौढांसाठी असून सेक्स या विषयाला वाहिलेली आहे. या सिरीजमध्ये सेक्सबाबत गैरप्रकार चालणाऱ्या होस्टेलचे नांव "अहिल्याबाई लेडीज हॉस्टेल" असे दाखवण्यात आले आहे. अहिल्याबाई होळकर या देशातील नितीमान राज्यकर्त्यांच्या यादीत सर्वोच्च स्थानावर असून त्यांना तत्वज्ञ महाराणी म्हणून सुद्धा ओळखले जाते. असे असूनही एकता व शोभा कपूर यांनी निर्माण केलेल्या सीरीजमध्ये अहिल्याबाईचे नाव कुटिल उद्देशाने वापरुन त्यांचा व समस्त देशवासीयांचा अवमान केला आहे.
निर्माती शोभा कपूर व एकता कपूर आणि दिग्दर्शक साक्षात दळवी व संगीता राव यांच्याविरुद्ध महापुरुषांचा अवमान, समाजात रोष निर्माण करणे, शांतता बिघडवणे या गुन्ह्यांतर्गत योग्य त्या भारतीय दंडविधानाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करुन त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या वेब सिरीजचे प्रक्षेपण थांबवण्यात यावे ,अशा स्वरूपाची तक्रार नवघर पोलीस ठाण्यात व भाईंदर उपविभागीय अधिकारि यांना धनगर समाज एकीकरण समिती यांच्यावतीने अध्यक्ष शंकर वीरकर व सचिव डॉ. सुरेश येवले, राज बंडगर खजिनदार व साईनाथ बंडगर, सुनील वीरकर तसेच विद्या बोधे, निर्मला पाल यांनी दिली आहे.