गेल्यावर्षी कोरोनाने कहर माजविला आणि या महामारीने अनेकांचे प्राण घेतले. तसेच या विषाणूमुळे लादलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आणि अनेकांनी आर्थिक नुकसान भोगले ज्यात मनोरंजनसृष्टीही मोडते. मनोरंजनसृष्टी खरोखरीची मोडली होती आणि मोडीत निघते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु अनलॉक होताना मनोरंजन विश्वाला झुकते माप मिळाले आणि त्यांनी शुटिंग्सना सुरुवात करून पुन्हा बस्तान बसविण्यास सुरुवात केली. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे अनेक जण गाफील होते. परंतु आता महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन घोषित केल्यामुळे अनेकांनी आपला ‘प्लॅन बी’ बाहेर काढला आहे.
या नवीन लॉकडाऊनमध्ये सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे तर बंदच ठेवण्यात आली असून कुठल्याही प्रकारच्या शूटिंगला महाराष्ट्रात तरी परवानगी नाही. यामुळे मराठी मालिकांपासून, ज्या प्रेक्षक आवर्जून पाहतात व चर्चा करतात, प्रेक्षकांना वंचित राहावे लागेल. त्यापुढे गेले तर नवीन भाग दाखविता नाही आले तर निर्मात्यांना जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागेल. त्यातच भारतातील प्रसिद्ध क्रिकेट-मेळा ‘आयपीएल’ सुरु असून प्रेक्षक तिथे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीने एक बोल्ड पाऊल उचलले आहे.