महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कांताबाई सातारकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतीक क्षेत्राचे मोठे नुकसान - बाळासाहेब थोरात - कांताबाई सातारकर यांना श्रध्दांजली

तमाशासह लोककला क्षेत्रात आपले आयुष्य वेचणार्‍या कांताबाईंनी कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करताना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात भरीव असे मोठे योगदान दिले असून त्यांच्या निधनाने लोककला क्षेत्रातील एक तपस्वी व्यक्तिमत्व हरपले असल्याचे सांगत महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आदरांजली वाहिली.

death-of-kantabai-satarka
कांताबाई सातारकर

By

Published : May 25, 2021, 7:22 PM IST

संगमनेर- तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच संगमनेरमध्ये निधन झालं. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आदरांजली वाहिली आहे. तसेच अनेकजण त्यांना श्रध्दांजली वाहात आहेत.

ज्येष्ठ लोक कलावंत कांताबाई सातारकर यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले की, कांताबाई सातारकर यांनी संगमनेरचे नाव राज्य पातळीवर पोहोचवले. तमाशा ही महाराष्ट्राची प्रमुख लोककला असून गेली पन्नास वर्ष या लोककलेच्या माध्यमातून कांताबाईंनी महाराष्ट्रातील जनतेची सेवा केली. महाराष्ट्रभर फिरत असताना त्यांनी संगमनेरची वैभवशाली परंपरा कायम जोपासली . आपल्या भरदार अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका गाजविल्या. रायगडची राणी, डोम्या नाग ,कलंकिता मी धन्य झाले, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, विशाल गड ची राणी ,कोंढाण्यावर स्वारी ,असे विविध वगनाट्य त्यांचे अजरामर ठरले. त्यातील त्यांच्या दमदार भूमिकांना लोकांनी अक्षरश डोक्यावर घेतले . कांताबाई सातारकर सह रघुवीर खेडकर या तमाशाच्या माध्यमातून सुमारे 200 कलाकारांना त्यांनी सांभाळले.

अलका, अनिता, रघुवीर, मंदा या चार मुलां मुलींनी आपल्या आईची परंपरा जोपासत सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. या परिवाराचा संगमनेरकरांनी कायम अभिमान बाळगला असून कांताबाई सातारकर यांना राज्य पातळीवर विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. संगमनेरमधील नागरिकांच्या वतीने त्यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोठा कृतज्ञता सोहळा आपण साजरा केला होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या संस्कृती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून या क्षेत्रातील ज्येष्ठ तपस्वी कलावंत हरपल्याची भावना थोरात यांनी व्यक्त केली आहे.

लोककला क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शिका हरपल्या - आमदार डॉ. तांबे

गेली पन्नास वर्ष तमाशा या लोककलेच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार्‍या कांताबाई सातारकर यांनी वगनाट्यातून अनेक पुरुषी भूमिकाही साकारल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार्‍या या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाने कायम सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे संगमनेर करांसाठी कायम भूषणावह राहिले. त्यांच्या निधनाने तमाशा व लोककला क्षेत्राची मोठी हानी झाली असून या क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शिका हरपली असल्याची भावना आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.

लोककलावंतांची आई हरपली - दुर्गाताई तांबे

श्रीमती कांताबाई सातारकर या संगमनेरकरांसाठी कायम भूषण होत्या. आमच्या दोन्ही परिवारांचे त्यांची बरोबर कायम जिव्हाळ्याचे संबंध राहिले. कांताबाईंचा राज्य पातळीवर होणारा गौरव हा संगमनेरकरांचा गौरव होता. त्यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भव्य कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी नामदार थोरात यांनी शतकपूर्ती व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली होती .मात्र नियतीला ते मान्य नव्हते. त्यांच्या निधनाने लोककला क्षेत्रातील अनेक कलावंतांची आई हरपली असल्याची भावना नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details