‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रभर तूफान गाजत आहे. या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातलीचं पण मोठ्या रूपातील बाळूमामांनी ज्यांनी आपल्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवले त्या रूपालादेखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले. बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडला. अवघा महाराष्ट्र या जयघोषाने दुमदुमला.
बाळूमामांचं तरुणपण जसं मेंढ्यासोबत रानोमाळ फिरण्यात गेलं तसंच त्यांचं उत्तरार्ध देखील वेगवेगळ्या ठिकाणी रानोमाळ फिरण्यातच गेलं. या उत्तरार्धामध्ये एक महत्वाचा बदल झाला होता.तो म्हणजे बाळूमामा लोकांना ठाऊक झाले होते. असंख्य माणसं त्यांच्याशी प्रेमाच्या नात्यानं जोडलेली होती. अनेक कुटुंबांचा मामा आधार झाले होते. कधी योग्य सल्ला देऊन,कधी चुकीच्या वाटेवर जाणार्याला योग्य वाटेवर आणून, कधी सहाय्य करून, कधी चमत्कार करून लोकांच्या कल्याणाचे कार्य ते करत राहिले. त्यांचे एकूण कार्य पाहिल्यानंतर असे लक्षात येते की, उपाशी पोटी अध्यात्म त्यांनी कोणालाच करायला सांगितले नाही. अन्न, वस्त्र, निवारा नसेल तर आधी तो प्रश्न मार्गी लावण्याकडे त्यांचा भर होता. मनुष्याला काही व्याधी असतील तर त्या आधी बर्या करण्यावर त्यांनी प्राथमिकता दिली आणि नंतर लोकांना भजन, कीर्तन, पंढरीची वारीची सोपी साधना दिली.
बाळूमामा हे सर्वदूर परिचित जरी झाले असले तरी त्यांच्यासाठी संघर्ष काही कमी झाला नव्हता. समाजात जात–पात, अंधश्रद्धा, भेदाभेद ह्या गोष्टी काही संपलेल्या नव्हत्या. हा काळ स्वातंत्र्यानंतरचा आहे. त्यामुळे एक मोठ्या बदलाचा काळ त्यांनी पाहिला. लोकांना तेव्हा एका मोठ्या आधाराची गरज होती, त्यावेळी मामा एखाद्या मोठ्या वटवृक्षासारखे सावली देणारे ठरले. समाज जरी एका मोठ्या बदलातून जात असला तरी त्यांनी त्यांचे ठरवलेले कार्य अहोरात्र चालू ठेवले. त्यांच्यासमोर येणाऱ्या माणसांचे त्यांनी जगण्याचे प्रश्न पहिले सोडवले आणि मग त्यांना अध्यात्माची गोडी लावली. आता विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सुरू होणार बाळूमामांच्या चरित्राचा नवा अध्याय प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.