महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत होणार दादोजी कोंडदेव यांची एंट्री - ‘Swarajyajanani Jijamata’ on Sony Marathi channel

राजमाता जिजाऊ म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती! ‘हळवी आई’ आणि ‘कणखर राज्यकर्ती’ अशा दोन्ही बाजू मालिकेच्या माध्यमातून पोहचवण्यात यशस्वी ठरलेली सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेद्वारे प्रेक्षकांना पहायला मिळत आहे.

swarajyajanani-jijamata
स्वराज्यजननी जिजामाता

By

Published : Aug 28, 2020, 1:38 PM IST

मुंबई -‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका आता एका वेगळ्या उंचीवर आली असून, कधानक पुढे सरकत जाईल तसतशी मालिका नव्या वळणावर येणार आहे. जिजाऊंचे पुण्यातलं आगमन हे स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाचं पाऊल. शहाजीराजांनी जिजाऊंच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. महत्त्वाच्या घडामोडींच केंद्र ठरलेल्या पुण्यातील या घटनांचे चित्रण आता ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतून पहायला मिळणार आहेत.

पुण्याच्या वेशीवर पहार उखडणे, सोन्याच्या नांगराने नांगरलेली जमीन, पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना, लालमहालाची बांधणी यातलं नेमकं काय बघायला मिळणार? याबाबतची उत्सुकता आगामी येणाऱ्या काही भागातून उलगडली जाणार आहे. या मालिकेतील दादोजी कोंडदेव यांचे पात्र कशा प्रकारे रंगविले जाईल ? याची उत्सुकता देखील आहेच. याबद्दल बोलताना निर्माते सांगतात की इतिहासाला अनुसरूनच हे पात्र असणार आहे. मुळात दादोजी कोंडदेव यांचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत योगदान किती यावर इतिहासकरामध्येच मतभेद आहेत. त्यामुळे दादोजींची व्यक्तीरेखा नक्की कशी दाखवली जाईल याबाबत उत्सुकता कायम आहे.

स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेची निर्मिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्स कडून करण्यात आली आहे. याच निर्मिती संस्थेने स्वराज्यरक्षक संभाजी मालिका देखील बनवली होती. त्यातही अनाजी पंतांची कारस्थानं, शिवाजी महाराजांचा मृत्यू, संभाजी महाराजांवर झालेले बदफैलीचे आरोप असे अनेक वादाचे विषय होते. मात्र तरिही कोणत्याही वादात अडकल्याशिवाय या मालिकेने 700 एपिसोड पूर्ण करून प्रेक्षकांची रजा घेतली. मात्र आता दादोजींच्या पत्रामुळे पुन्हा एकदा एक नाजूक विषय मालिकेच्या निर्मात्यांना हाताळावा लागणार आहे. त्यामुळेच आता ही भूमिका नक्की कोण साकारणार आणि ती कशा पद्धतीने मालिकेत दाखवली जाणार याबद्दल उत्सुकता कायम आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details