महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सोनी मराठीवर 'कोण होणार करोडपती' आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांचा संगम! - सोनी मराठीवर ' ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’

सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हे दोन लोकप्रिय शो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. आता या दोन शोंचा संगम होणार आहे. येत्या 7 ऑगस्टला ‘कोण होणार करोडपती’च्या सेटवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे हास्यवीर येणार आहेत.

'Kon Honar Crorepati show on Sony Marathi!
सोनी मराठीवर 'कोण होणार करोडपती'

By

Published : Aug 6, 2021, 8:03 PM IST

सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून प्रेक्षक त्याला प्रचंड पाठिंबा देताहेत. सचिन खेडेकर यांचे खुमासदार सूत्रसंचालन प्रेक्षकांना भावतेय. हा ज्ञानाचा खेळ असून कुठल्याही स्तरातील व्यक्तीला करोडपती होण्यास संधी आहे. तसेच सामान्यातला सामान्य माणूस या खेळात भाग घेऊ शकतो आणि विजयी होऊ शकतो. तसेच प्रेक्षकांचा हुरूप वाढविण्यासाठी वेगवेगळ्या नामांकित पाहुण्यांना निमंत्रित करण्यात येते.

सोनी मराठी वाहिनीवरील हास्यजत्रेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. आपल्या विनोदाने करोनाच्या कठीण काळात सुद्धा प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांना हास्यथेरपी दिली. या विनोदवीरांची ही हास्यजत्रा संपूर्ण महाराष्ट्राच्या टेन्शनवरची मात्रा ठरली आणि आता हे करोडोंचे आवडते हास्यवीर येणार आहेत कोण होणार करोडपती विशेष भागात शनिवारी, ७ ऑगस्टला.

या वर्षी लोकमान्य टिळकांचं १०१ वं पुण्यसमरण झालं. चिपळूणला लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आहे जिथे हजारो पुस्तकं, अश्मयुगीन हत्यारे, शिवकालीन ढाल तलवारी,सातवाहन काळातील नाणी, वेगवेगळ्या कालखंडातील दस्तऐवज, मूर्ती, नाणी, भांडी, दिवे, जन्मपत्रिका, मान्यवर नेत्यांच्या स्वाक्षऱ्या अशा सर्व गोष्टींचा संग्रह केलेला आहे. संपूर्ण कोंकणात असे पहिलेच ऐश्वर्यसंपन्न संग्रहालय आहे. टिळकांचा ज्ञानाचा वारसा जपण्याचा प्रयत्न इथे पुरेपूर केलेला दिसतो पण हे संग्रहालय जिद्दीनं पुन्हा उभं करता यावं यासाठी हास्यजत्रेतील विनोदवीरांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

जुलै महिन्यात आलेल्या महाभयंकर पुरानं लोकमान्य टिळक स्मारक मंदिर उद्ध्वस्त केलं आहे. आपले समाजाप्रती कर्तव्य जाणून हास्यजत्रेची टीम कोण होणार करोडपतीच्या मंचावर आली आहे. हे संग्रहालय आणि ग्रंथालय जिद्दीनं पुन्हा उभं करता यावं यासाठी हे विनोदवीर ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहे. सचिन मोटे, सचिन गोस्वामी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले हे विनोदवीर लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण साठी खेळणार आहेत. चिपळूणमधील १५६ वर्षांचा हा वाचन इतिहास पुन्हा उभा करण्यासाठी अशोक नायगावकर आणि इतर सर्वजण आपल्यापरीने मदत करत आहेत.

दर शनिवारी कोण होणार करोडपती कर्मवीर विशेष भाग होतो. कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन समाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. या शनिवारी कोण होणार करोडपती विशेष भाग होणार असून त्यात हास्यकलाकार हॉटसीटवर खेळणार आहेत. मंचावर प्रसाद आणि समीर यांनी त्यांच्याबरोबर घडलेले काही विनोदी किस्से सांगितले तर समीर-विशाखा यांनी जाऊया गप्पांच्या गावाचं छोटंसं सादरीकरण देखील करून दाखवलं. यावेळी सचिन खेडेकर यांना देखील हसू अनावर झालं आणि त्यांनी या हास्यथेरपीचा आनंद घेतला. नम्रताने यावेळी एक गाणं सादर केलं.

हास्यजत्रेच्या कलाकारांच्या मंचावर येण्याने कोण होणार करोडपतीच्या मंचाला वेगळाच रंग चढला होता. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांना मदतीचा हात म्हणून हास्यकलाकार कोण होणार करोडपतीच्या मंचावर आले. इथे जिंकलेली रक्कम ही लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण याच्या पुनरुभारणीसाठी वापरण्यात येणार आहे.

‘कोण होणार करोडपती’ व ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ चा संगम बघायला मिळेल या शनिवारी ७ ऑगस्ट रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

ABOUT THE AUTHOR

...view details