यशोमन, मयूरी, सुयश, निवेदिता आणि भरतचं अफलातून समीकरण, 'कम्फर्ट नात्यांचा'! - New short film Comfort Natyancha
नवीन लघुपट आलाय ज्याचं नाव आहे ‘कम्फर्ट नात्यांचा' ज्यातून प्रथमच यशोमन, मयूरी, सुयश, निवेदीता आणि भरतचं अफलातून समीकरण पहायला मिळणार आहे. कुटुंबातील नातेसंबंधात बाप लेकीच्या नात्याची बात काही औरच असते. अशी बाप लेकीची कथा 'कम्फर्ट नात्यांचा'' या लघुपटात सांगण्यात आली आहे.
सध्या शॉर्ट्स फिल्म्सना बरंच महत्व आलंय. कमी वेळात महत्वाचा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचं अवघड काम यातून होत असते. आता तर लघुपटांना सर्वच पुरस्कार सोहळ्यांतून मानसन्मान दिला जातो. मराठीतही लघुपटांतून नामांकित लेखक, दिग्दर्शक, कलाकार हजेरी लावताना दिसतात. असाच एक नवीन लघुपट आलाय ज्याचं नाव आहे ‘कम्फर्ट नात्यांचा' ज्यातून प्रथमच यशोमन, मयूरी, सुयश, निवेदीता आणि भरतचं अफलातून समीकरण पहायला मिळणार आहे.
काही लघुपट अतिशय कमी वेळात पूर्ण लांबीच्या चित्रपटांपेक्षाही प्रभावी संदेश देत मनामनांत घर करतात. नात्यांच्या धाग्यांची वीण जितकी घट्ट असते, तितकं ते नातं अधिक दृढ आणि विश्वासपात्र ठरतं. गुढीपाडव्यानिमित्त अशाच नाजूक नात्यांच्या प्रेमाची कथा कॉटनकिंगच्या सहाय्यानं प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अद्भुत क्रिएटीव्हजच्या मोनिका धारणकर लिखित आणि वैभव पंडित दिग्दर्शित ''कम्फर्ट नात्यांचा" कॅाटन आणि नात्यांची सांगड घालत एक महत्त्वपूर्ण मेसेज समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. कॉटन किंगचे कौशिक मराठे म्हणतात की कपड्या प्रमाणे जर नाती ही जरा सुटसुटीत राहिली तर कुटुंब सदृढ राहील.