मुंबई- 'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावर प्रेक्षकांना अनेकदा महेश काळे यांनी सादर केलेल्या गाण्यांचा नजराणा मिळाला आहे. त्यांच्या गायकीने आपल्याला अनेकदा सुखद अनुभव दिला आहे. पण येत्या आठवड्यामध्ये मात्र सूर नवा, ध्यास नवा या मंचावर रंगणार आहे शास्त्रीय सुरांची खास जुगलबंदी.
'सूर नवा ध्यास नवा' च्या मंचावर राहुल देशपांडे, महेश काळे पहिल्यांदाच एकत्र - महेश काळे
येत्या आठवड्यामध्ये शास्त्रीय संगीतातील दोन हिरे प्रथमच 'सूर नवा, ध्यास नवा' या कार्यक्रमाच्या मंचावर एकत्र दिसणार असून या कार्यक्रमात त्यांची जुगलबंदी रंगणार आहे
कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर शास्त्रीय संगीतातील ज्या दोन हिर्यांची अजून लखलखीत ओळख महाराष्ट्राला झाली. हे दोन गायक म्हणजे महेश काळे आणि राहुल देशपांडे. आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीताचा वारसा राहुल देशपांडे गेले अनेक वर्ष समर्थपणे पुढे नेत आहेत. आपल्या गायकीमधील नवनवीन गोष्टी तो प्रेक्षकांसमोर सादर करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात वा भारतातच नव्हे तर विदेशातसुध्दा आपल्या शास्त्रीय कलेचे प्रयोग सादर करून महेश काळे जगभरातील रसिक प्रेक्षकांची माने जिंकत आहेत. या दोघांनी कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर तरुण पिढीला शास्त्रीय संगीताकडे खेचून आणण्याची किमया करून दाखविली आहे.
आता हे दोन दिग्गज प्रथमच सूर नवा, ध्यास नवाच्या मंचावर एकत्र दिसणार आहेत. कार्यक्रमात त्यांची जुगलबंदी रंगणार आहे. गप्पा रंगणार आहेत. ते काही अनुभव, अविस्मरणीय आठवणी प्रेक्षकांना सांगणार आहेत.