मुंबई -राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. या संदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
लवकरच एसओपी करणार जाहीर -
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह बंद आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्यांवर उपासमाराची पाळी आली होती. राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह पुन्हा सुरु करावी, या मागणीसाठी रंगकर्मी, निर्माते आणि कलाकार यांनी आंदोलन केले होते. चित्रपटगृह, नाट्यगृह पुन्हा सुरु करण्याच्या मुद्द्यावर आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. बैठकीत राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु करण्यावर सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेत चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. लवकरच यासंदर्भातील एसओपी तयार करुन ती जाहीर करु असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.