मुंबई- ज्येष्ठ नाटककार आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांचं १० जूनला दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्यावतीने श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यशवंत नाट्यमंदिरात पार पडलेल्या या श्रद्धांजली सभेसाठी मराठी आणि हिंदी रंगभूमीवर कार्यरत असलेल्या अनेक रंगकर्मींनी आवर्जून हजेरी लावली.
गिरीश कर्नाडांची श्रद्धांजली सभा या श्रद्धांजली सभेसाठी डॉ. जब्बार पटेल, अभिनेते कुलभूषण खरबंदा, ज्येष्ठ रंगकर्मी अतुल तिवारी, प्रेमानंद गजवी, रामदास भटकळ, नीरजा, प्रसाद कांबळी, मंगेश कदम, रसिका आगाशे तसेच अनेक हिंदी आणि मराठी रंगभूमीवरील मान्यवर उपस्थित होते. या सगळ्यांनीच गिरीश कर्नाड यांच्या व्यक्तिमत्त्वातील अभिनेता, दिग्दर्शक आणि चळवळीतील कार्यकर्ता अशा तिन्ही बाजूंनी आढावा घेतला.
जब्बार पटेल यांनी आपल्या या मित्राला श्रद्धांजली देताना अनेक जुन्या आठवणींचा पट उलगडला. बंगालीत बादल सरकार, हिंदीत मोहन राकेश, मराठीमध्ये विजय तेंडुलकर आणि कन्नडमध्ये गिरीश कर्नाड या चार नाटककारांचा कालखंड एकमेकांना समांतर जातो. हा कालखंड भारतीय रंगभूमीसाठी फार महत्त्वाचा कालखंड समजला जातो. यात गिरीश सगळ्यात लहान असले तरीही या तीन नाटककारांच्या तोडीची नाटक लिहून ती अन्य भाषांमध्ये भाषांतरित झाल्याने नाटकाचा परिवेश एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाणं शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रेमानंद गजवीनींही वाहिली श्रद्धांजली...
प्रेमानंद गजवी यांनी नाटकातून मिथक एवढ्या प्रभावीपणे मांडणारा नाटककार पुन्हा होणं अवघड आहे, असं सांगताना 'नाग मंडल' या त्यांच्या नाटकाचं वेगळेपण आणि त्यांची जन्मकथा उलगडून सांगितली. त्यासोबतच गिरीश कर्नाड यांच्यासारखा चळवळीतील रंगकर्मी गेल्याने त्यांची जागा आता कोण भरून काढू शकेल, असा सवाल उपस्थित केला.