दौंड- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मार्च २०२० पासून कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र एवढ्या लवकर थांबेल तो कोरोना कसला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वात मोठा फटका बसला तो महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणी कलावंतांना व तमाशात काम करणाऱ्या कलावंतांना. सध्या तमाशा व कला केंद्र बंद असल्यामुळे 'पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची' असं म्हणणाऱ्या लोक कलावंतांवर आता 'पोटाला चिमटा' काढून जगण्याची वेळ आली आहे.
तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ
महाराष्ट्राची लोककला म्हणून लोकमान्य पावलेल्या लोकनाट्य अर्थात तमाशाची अत्यंत बिकट अवस्था आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे तमाशा फड मालकांचा यात्रांचा हंगाम पुर्णत: वाया गेला. अशा परिस्थितीत लोकप्रबोधनाचे कार्य करत असलेल्या राज्यातील हजारो तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. आता अचानक ३० एप्रिलपर्यंत कला केंद्र बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे महिनाभर करायचे काय? पैसे न आल्यास जगायचे कसे? खायचे काय? असे एक ना अनेक प्रश्न कलावंतांसमोर आहेत. त्यामुळे कला केंद्रमालक देखील चिंतेत आहेत.
यात्रा बंद झाल्या आणि दुष्टचक्र वाढलं
यात्रा जत्रा म्हटलं की, वर्षभर गावाबाहेर असलेले चाकरमानी गावांमध्ये येतात, सासुरवाशीना आपल्या माहेरची ओढ लागलेली असते. गावामध्ये ग्रामदेवतेचा छबीना, मिरवणूक, लहान मुलांसाठी खेळण्याची दुकाने, गगनचुंबी पाळणे, विविध धाडसी खेळ, कुस्तीचा आखाडा याच बरोबर मनोरंजनासाठी गावोगावी तमाशाचा कार्यक्रम ठेवला जातो. एका तमाशा फडामध्ये सुमारे १०० पेक्षा जास्त कलावंत आपली वेगवेगळी भूमिका बजावत असतात. वर्षातील चार महिने यात्रा जत्रांमध्ये खेळ करून आपला वर्षभराचा उदरनिर्वाह केला जातो.
लावणी कला टिकवण्याचे मोठे आव्हान
मात्र गेल्यावर्षी ऐन यात्रांच्या सीजनमध्ये कोरोना महामारी ने थैमान घातले. शासनाने लॉकडाऊन केले. गावोगावच्या यात्रा जत्रा बंद करण्यात आल्या. लोक मनोरंजनासाठी असलेली कला केंद्र देखील बंद झाली. सद्या जगाने आधुनिकीकरणाकडे वाटचाल सुरू केली. अँड्रॉइड मोबाइल, टीव्ही,संगणक अशी वेगवेगळी मनोरंजनाची साधने निर्माण झाली. यामुळे लावणीकडे पहाण्याचा लोकांचा कलही बदलत गेला. आधुनिकतेची कास धरलेल्या जमान्यात तमाशा व कला केंद्रातून पारंपारिक लावणी लोककला जोपासण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.