मुंबई - देशभर सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस ज्याप्रकारे जनतेशी वागत आहेत, ते बॉलिवूड सेलेब्सना खटकले आहे. देशात अनेक ठिकाणी पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे लोकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. यानंतर अनेक मोलमजुरीसाठी आलेले लोक आपल्या गावी परतत आहेत. वाहने नसल्यामुळे मुलाबाळांसह चालत जाणाऱ्या अशा अनेक लोकांना पोलिसांनी आपल्या लाठ्या काठ्यांनी सुजवले आहे. असाच एक व्हिडिओ शेअर करीत अनुराग कश्यप यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं., ''भयावह आहे.''
लेखक आणि कॉमेडियन वरुण ग्रोव्हरने हाच व्हिडिओ पोस्ट करीत विचारलंय, ''हा देश फक्त घरवाले आणि पॉवरवाल्यांचा आहे.'' त्याने लिहिलंय, ''एक मजूर आपल्या घरी ३०० किलोमिटर चालतही जाऊ शकत नाही? तो शहरातच भुकेने मरावा असे सरकारला वाटतेय का? तेही असा किटाणू ज्याच्याबद्दल त्याला माहितीही नाही.''
दिग्दर्शक संजय गुप्ता यांनीही राग व्यक्त करताना ट्विट केलंय, ''लाठी चार्जवाला काळ रोखा.''