मुंबई -सोशल मीडियावर आजकाल नवनविन ट्रेण्ड लगेचच व्हायरल होताना पाहायला मिळतात. या माध्यमातून कलाकार आपल्या चाहत्यांशी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स देत असतात. मात्र, अचानक या कलाकारांमध्ये वृद्ध होण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. तरीही वृद्धावस्थेतही त्यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.
अभिनेत्री सोनम कपूरपासून म्हातारपणीचे फोटो शेअर करण्यास सुरुवात झाली. सोनमने काही दिवसांपूर्वी तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहुन चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण, सोनम यामध्ये ७०-८० वर्षाची असल्याचे दिसत होती.
यामागे 'ओल्ड एज फिल्टर' हा नव्याने व्हायरल होत असलेला ट्रेण्ड आहे. हे फिल्टर वापरुन तुमचे फोटो वृद्धावस्थेत करता येतात. याच फिल्टरचा वापर करुन बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी आपले फोटो शेअर केले आहेत.
सोनम कपूरनंतर आता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचाही फोटो व्हायरल झाला आहे. दोघेही म्हातारपणी कसे दिसतील, ते या फोटोमध्ये पाहायला मिळते.
तर, वरुण धवन आणि अर्जुन कपूर यांचेही म्हातारपणीचे फोटो समोर आले आहेत. दोघांनीही हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या फोटोवर चाहते प्रतिक्रिया देखील देत आहेत. वृद्ध लूकमध्येदेखील या कलाकारांचा अनोखा स्वॅग पाहायला मिळतो.