मुंबई- सोशल मीडियावर अजूनही धुमाकूळ घालणारा इंटरनेट सेन्सेशन गाणे 'कच्चा बदाम' फेम गायक भुबन बदायकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच रस्ता अपघातात जखमी झालेल्या भुबनने 'कच्चा बदाम' या गाण्यासाठी प्रसिद्ध झाल्यानंतर स्वतःला सेलिब्रिटी म्हणवणाऱ्या आपल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. भुबनच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर काही लोकांनी त्याला घेरायला सुरुवात केले होते.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना भुबनने आपली सेलिब्रिटी टिप्पणी निषेधार्ह असल्याची कबुली दिली. तो म्हणाला, ''मला आता कळले आहे की मी असे बोलायला नको होते. लोकांनी मला सेलिब्रिटी बनवले आहे, माझी परिस्थिती पुन्हा बिघडली तर मी पुन्हा कच्चा बदाम विकू लागेन.''
''लोकांकडून इतकं प्रेम मिळाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मी एक साधा माणूस आहे आणि साधं आयुष्य जगलो आहे, स्टारडम, मीडियाचे लक्ष आणि ग्लॅमर नेहमीसाठी नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक माणूस म्हणून माझ्यात काहीही बदल झालेला नाही,'' असे भुबनने सांगितले.