मुंबई - अँड टीव्हीवरील मालिका 'डॉ. बी. आर. आंबेडकर'च्या आगामी भागात भीमराव (आयुध भानुशाली) अत्यंत क्लेशकारक स्थितीचा सामना करतात. भीमरावांची बहीण गंगाबाईच्या (सपना देवलकर) पतीचा प्लेगमुळे मृत्यू होतो. पतीच्या मृत्यूनंतर सासरची माणसे तिचा छळ करू लागतात आणि त्याच्या मृत्यूचा दोष तिला देतात. ती अखेर तिच्या मुलांसह सासरचे घर सोडून रामजीच्या (जगन्नाथ निवंगुणे) घरी राहायला येते. तिला पाहून रामजी अचंबित होतात. पण लवकरच त्यांना समजते की, काहीतरी चुकीचे घडले आहे आणि ते तिला प्रकरण शांत होईपर्यंत राहण्यास देतात.
गंगाबाईची सासरची माणसे तिच्या माहेरी येऊन त्यांच्या नातवंडांचा ताबा मागतात, ज्याचा भीमराव व त्यांच्या कुटुंबाला खूप त्रास होतो. आता गंगाबाईला या प्रकरणातून सोडवण्याची आणि मुले तिच्यासोबत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर, तसेच त्यांच्या कुटुंबावर येऊन पडते. पण, एक कटू घटना घडते, जेथे दामोदर गायब होतो आणि त्याचे जीवन धोक्यात असते. त्याच्या गायब होण्यासाठी भीमरावांना दोष दिला जातो.