‘भाबीजी घर पर है' ही विनोदी मालिका सुरु होऊन अनेक वर्षे लोटली आहेत. यात अंगुरी भाभी आणि अनिता भाभीच्या भूमिकेत एकापेक्षा जास्त अभिनेत्री दिसल्या. आता ‘तिसरी’ अनिता भाभी मालिकेत एन्ट्री घेत आहे. याआधी सौम्य टंडन आणि नेहा पेंडसे यांनी ही भूमिका साकारलेली आहे. आता नवीन अनिता भाभी प्रेक्षकांच्या भेटीला आली असून ती भूमिका अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव साकारणार आहे. भाबीजी घर पर है'च्या टीमकडून या ‘तिसऱ्या’ अनिता भाभीचे जंगी स्वागत करण्यात आले. विदिशा श्रीवास्तव एण्ड टीव्हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है'मध्ये अनिता भाभीची प्रमुख व आयकॉनिक भूमिका साकारण्यास सज्ज असताना सर्व कलाकार व टीमने केक कापण्याच्या समारोहासह तिचे स्वागत केले आणि तिच्याप्रती प्रेम व पाठिंबा व्यक्त केला.
विदिशाचे स्वागत करत एडिट २ प्रॉडक्शन्समधील निर्माता संजय कोहली म्हणाले, ''आम्ही आमची नवीन अनिता भाभी म्हणून विदिशाचे स्वागत करण्यास खूपच उत्सुक व आनंदित आहोत. तिचा प्रवेश दाखवणारा एपिसोड अत्यंत उत्साहवर्धक व रहस्यमय आहे. आम्ही आशा करतो की प्रेक्षक तिच्यावर प्रेम व आपुलकीचा वर्षाव करतील आणि खुल्या मनाने तिचे स्वागत करतील. 'भाबीजी घर पर है' परिवारामध्ये विदिशाचे स्वागत!'' एडिट २ प्रॉडक्शन्समधील निर्माता बिनायफर कोहली म्हणाल्या, ''आम्हाला आमची नवीन अनिता भाभी म्हणून विदिशाची नियुक्ती करण्याचा आनंद होत आहे. विदिशाने सुरेखरित्या भूमिकेला आत्मसात केले आहे, जे मालिकेमध्ये पाहणे पूर्णत: आनंददायी असणार आहे. ती उत्तम व्यक्ती आहे आणि सर्वांमध्ये मिसळून गेली आहे. तिचा लूक उत्साहवर्धक आहे आणि निश्चितच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल.''
सेटवर उत्साहपूर्ण स्वागताबाबत आपला आनंद व्यक्त करीत विदिशा म्हणाली, ''मला इतका उत्साह, प्रेम व आपुलकी पाहून खूपच आनंद झाला, जेथे माझे सेटवर स्वागत करण्यात आले. हा दिवस माझ्यासाठी खूपच खास ठरला. मी अनिता भाभीच्या आयकॉनिक भूमिकेमध्ये सामावून जाण्याची मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी माझ्या क्षमतांवर विश्वास दाखवण्याकरिता संजय व बीनायफर जी यांचे आभार मानते.आसिफ शेख, रोहिताश्व गौड, शुभांगी अत्रे यांसारख्या दिग्गज व अनुभवी कलाकारांसोबत, तसेच प्रतिभावान टीमसोबत काम करण्याची ही अद्भुत संधी मिळणे स्वप्नवत आहे. मी शूटिंगला सुरूवात केली आहे आणि २२ मार्च रोजी मालिकेतून माझे दर्शन होणार आहे. मी आशा करते की, प्रेक्षकांना ‘ही’ अनिता भाभी सुद्धा खूप आवडेल.”