ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र कोल्हटकर यांचे वृध्दापकाळाने निधन
ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र कोल्हटकर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे.
ठाणे- डोंबिवलीतील जुने नाट्यकर्मी भालचंद्र कोल्हटकरांना गेले काही दिवस आजाराने ग्रासले होते. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास राहत्या घरी त्यांचे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर शिवमंदिर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पत्नी व एका मुलाचेही अकाली निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात कलाकार राम कोल्हटकर व २ नातू असा परिवार आहे.
डोंबिवली शहरातील अनेक संस्थांचे मार्गदर्शक, सल्लागार म्हणून ते कार्यरत होते. नाट्य, साहित्य यांसारख्या प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून हजेरी लावत. ते नवोदितांना मार्गदर्शन करायचे. राज्य नाट्य स्पर्धेच्या परिक्षणाची धुराही त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. मागील काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते. अखेरीस बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
भालचंद्र कोल्हटकर यांना शालेय जीवनापासून नाटकाची आवड होती. दादरच्या पोद्दार महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. मुंबई साहित्य संघ व सायं मित्र मंडळातर्फे होणाऱ्या नाटकात त्यांनी भूमिका केल्या होत्या. विशेष म्हणजे कै. मामा पेंडसे यांच्याबरोबर त्यांनी भाऊबंदकी नाटकात रामशास्त्री प्रभुणे यांची भूमिका केली होती. पुण्यप्रभाव, राजसंन्यास यासारख्या जुन्या व दर्जेदार नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. अभिनयासह कलाकारांना मार्गदर्शन करत असत. त्यांनी नाट्य चळवळ रुजवण्याचा प्रयत्न केला. ते खाजगी संस्थेत नोकरी करत होते. नोकरी करत असताना त्यांनी कलाही जोपासली.
अभिनयासह कलाकारांना मार्गदर्शन करत नाट्यचळवळ रुजविण्याचे कार्य कोल्हटकरांनी केले. कोल्हटकर यांच्या निधनामुळे नाट्यक्षेत्रात पोकळी निर्माण झाली असल्याच्या प्रतिक्रिया अंत्यसंस्काराच्यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. तर त्यांच्या निधनाने शहरातील सांस्कृतिक वर्तुळात पोकळी निर्माण झाली असून अखेरपर्यंत त्यांचा उत्साह ही त्यांची ओळख असल्याची भावना त्यांचे निकटवर्तीय अभिनेते नंदू गाडगीळ यांनी व्यक्त केली.