जीवनातील ताणतणाव दूर करायचा असेल तर विनोद कामी येतो. कॉमेडी नेहमीच ‘स्ट्रेस बस्टर’ राहिली असून विनोदाचा डोस नेहमीच मन प्रसन्न करतो. विनोदी प्रहसनांचा कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' प्रेक्षकांना नेहमीच हसवत आलाय आणि आता तो पुन्हा आठवड्यातील चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्राने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते आणि नकारात्मक वातावरणात त्यांच्या मनात उत्साह भरला होता. खरंतर उत्साह भरण्याचे काम हास्यजत्राचे कलाकार आजही समरसून करताहेत आणि प्रेक्षक सुद्धा त्यांना मनमुराद दाद देताना दिसताहेत. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता आठवड्यातून चार दिवस म्हणजेच सोम. ते गुरु. रात्री ९ वाजता. सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
मराठी प्रेक्षकांसाठी हसण्याचे वार आता आठवड्यातून चार झाले असून यानिमित्ताने रोहित राऊतने एक धमाल रॅप सॉंग गायलं आहे. यात आता चार वार, हास्यजत्रेचा चौकार असं म्हणतं सगळे कलाकार बिनधास्त डान्स करताना दिसत आहेत. प्रेक्षकांना देखील हे गाणं आवडलं असून त्यांची लाडकी हास्यजत्रा चार दिवस येणार असल्याचा आनंद त्यांना झाल्याचं दिसत आहे.
समीर चौघुले-विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर-नम्रता संभेराव, गौरव मोरे-वनिता खरात आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे. प्रसाद-नम्रता यांची जोडी नेहमीच सरस ठरते, गौरव आणि ओंकार यांचे विनोद प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. हास्यजत्रा पाहून आनंद आणि मनोरंजन मिळाल्याच्या कित्येक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळाल्या. रविवारची हास्यजत्रा झाल्यावर प्रेक्षकांनी चार दिवस ‘हास्यजत्रा’ची मागणी केली होती. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आता विनोदवीर आठवड्यातून चार दिवस हसविण्यासाठी यायला सज्ज झाले आहेत.