नुकताच कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेने २५० भागांचा पल्ला गाठला. रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे ही मालिका दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होतेय. स्ट्रॉबेरी पिक्चर्सच्या बॅनरखाली मनवा नाईक ने निर्मित केलेली ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचे यश तिने आपल्या मेहनती टीमला दिले आहे. या मालिकेमधील अक्षया नाईक, समीर परांजपे यांची जोडी प्रेक्षकांना भावतेय. त्याचबरोबर पूजा पुरंदरे, अतीशा नाईक, गौरी किरण, उमेश दामले, पूनम चौधरी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.
मालिकेमधील लतिका आणि अभिमन्यूची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे. या दोघांच्या सुखदु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली. कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत काही दिवसांपूर्वी अभिमन्यू आणि लतिकाच्या नात्याचे सत्य जहागीरदार आणि धुमाळ कुटुंबसमोर आले. आणि हे सत्य लपविल्यामुळे अभि आणि लतिकाचे नातं पणाला लागलं. प्रेमामध्ये प्रत्येकालाच परीक्षा द्यावी लागते आणि असेच काहीसे अभि आणि लतिकाबद्दल झाले आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी अभिमन्यू आणि लतिकाचे जुळू पाहणारं नातं पुन्हा दुरावलं. बापूंना सत्य कळताच त्यांनी त्यादिवसापासून मुलीच्या प्रेमापोटी खोट्या संसारातून तिला बाहेर काढलं. अभिमन्यूसमोर आता मोठा पेच उभा ठाकला आहे त्याला लतिकासोबतच बापू आणि संपूर्ण कुटुंबाची मनं जिंकायची आहेत. जहागीरदार आणि धुमाळ कुटुंबांत वाढत असलेल्या दुरावा आणि कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर होताना दिसत आहे. कारण अभिमन्यूला याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागते आहे.