गेल्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्मना प्रेक्षकांचा उत्तम पाठिंबा मिळू लागला होता. मनोरंजन मुठीत म्हणजेच मोबाईलवर उपलब्ध झाल्यामुळे तरुणाईने या प्लॅटफॉर्मला पसंती दिली होती. गेल्यावर्षी उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे लादलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना घरीच बसावे लागले होते. त्या काळात मनोरंजासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आणि त्यामुळेच वेब-मालिकांच्या व वेब-चित्रपटांच्या निर्मितीत लक्षणीय वाढ झाली. झी ५ हा एक प्रतिष्ठित ओटीटी प्लॅटफॉर्म आहे जो अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांची व चित्रपटांची निर्मिती करीत असतो. त्यांचे नवीन वेब-पुष्प म्हणजे ‘२०० - हल्ला हो’ हा सिनेमा जो हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित होणार आहे. सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित, या चित्रपटामध्ये, अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये, वरूण सोबती, साहील खट्टर, सलोनी बत्रा आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्या भूमिका आहेत.
ट्रेलरमध्ये कलाकारांनी साकारलेल्या दमदार भूमिकेची झलक दिसते. सत्य घटनेवर आधारित या कथेमध्ये स्त्रियांना न्याय मिळवण्यासाठी, कोणत्या परिस्थितीमध्ये हा लढा लढण्याची ताकद मिळाली आणि निर्णय घेतला याचे अतिशय सुरेख चित्रण केले आहे. या चित्रपटामध्ये, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, सैराट फेम रिंकू राजगुरू आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये अशी तगडी स्टार कास्ट असून हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.
‘२००- हल्ला हो’ या चित्रपटाद्वारे अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांचे बऱ्याच काळानंतर पडद्यावर पुनरागमन होत असून हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून त्यातील प्रेरित दमदार कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. याची गोष्ट आहे, २०० दलित स्त्रियांची ज्यांनी एकत्र येऊन गुंडगिरी करणाऱ्या टोळ्या, लुटेरे आणि बलात्काऱ्यांविरुद्ध कोर्टामध्येच कायदा आणि न्याय स्वतःच्या हातात घेतला.