लातूर : सोनी टीव्हीवरील 'कौन बनेगा करोडपती' या मालिकेतून अमिताभ बच्चन यांनी हिंदू धार्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजपाच्या आमदाराने केला आहे. औसाचे भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी बच्चन यांच्या विरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केलाय.
आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या केबीसी कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी एक प्रश्न विचारला होता. यामध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांनी व त्यांच्या अनुयायांनी 1927मध्ये कोणत्या शास्त्राच्या प्रती जाळल्या असल्याचे विचारण्यात आले होते. यावरून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप अभिमन्यू पवार यांनी केला आहे. या प्रश्नाकरिता चारही पर्याय हिंदू धर्माशी संबंधित धर्मग्रंथांचे होते. त्यांचा हेतू चांगला असता तर, त्यांनी चार पर्यायांमध्ये भिन्न धार्मिक ग्रंथांची नावे दिली असती. परंतु त्या पर्यायात फक्त हिंदू धार्मिक ग्रंथांचा उल्लेख केला गेला. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.
हिंदू आणि बौद्ध यांच्यात अंतर निर्माण केले
अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीने हिंदू आणि बौद्ध धर्मिय नागरिकांमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सामाजित दरी आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे एका मोठ्या षडयंत्राअंतर्गत केले गेल्याचा आरोपही अभिमन्यू पवार यांनी अर्जात केला आहे. लातूर पोलिसांनी ही लेखी तक्रार स्वीकारली असली तरी अद्यापपर्यंत या प्रकरणात एफआयआर दाखल झालेला नाही. पवार यांच्या आरोपांना आता पुढे कोणते वळण लागेल हे बघावे लागेल.