मुंबई - बॉलिवूड स्टार मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या प्रत्येक परफेक्ट गोष्टींसाठी ओळखला जातो. चित्रपट असो, त्याची शरीरयष्टी असो किंवा त्याचा आहार असो, प्रत्येक गोष्टीत तो अगदी चोखंदळ असतो. आजवर त्याने बऱ्याच चित्रपटांसाठी त्याचे वजन कमी जास्त केले आहे. त्यासाठी तो मेहनतही घेत असतो. मात्र, यासाठी त्याला आहाराबाबत अत्यंत काटेकोर पालन करावे लागते, असे त्याने सांगितले आहे. यासाठी त्याने घडलेला एक किस्साही सांगितला आहे.
आमिरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो त्याच्या आहारासंदर्भात कशाप्रकारे नियम पाळतो, हे सांगताना दिसत आहे. 'दंगल' चित्रपटादरम्यान त्याला त्याचे वजन काही दृष्यांसाठी घटवायचे होते, तर काही भागांसाठी वाढवायचे होते. त्यामुळे जर पार्ट्यांमध्ये गेल्यावर आमिर काय खातो, असे त्याला विचारण्यात आले होते. यावर त्याने अत्यंत मजेशीर उत्तर दिले आहे.
त्याने सांगितले, की 'मी जेथेही जातो, तिथे माझा जेवणाचा डब्बा घेऊन जात असतो. यावर विश्वास बसत नसेल, तर तुम्ही शाहरुखला विचारा. मी एका पार्टीसाठी त्याच्या घरी गेलो होते. त्यावेळी गौरीने मला जेवणासाठी बोलावले होते. त्यावेळी मी तिला म्हणालो होतो, की मी माझ्या घरूनच जेवणाचा डब्बा आणला आहे. त्यावेळी मी 'दंगल'च्या शूटिंगसाठी माझे वजन वाढवत होतो. माझ्या डब्ब्यातील जेवण पाहून सर्वजण अवाक झाले होते'.
आमिरच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. यावरून आमिर त्याच्या डायटचे किती काटेकोरपणे पालन करतो, हे लक्षात येते.