मुंबई - ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’च्या ‘जीवनगौरव पुरस्कारा’साठी मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांची निवड झाली आहे. हा सन्मान सोहळा येत्या १४ जूनला सायंकाळी साडेसहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक पुरस्कारासाठी ‘सोयरे सकळ’ या ‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’च्या नाटकाची निवड करण्यात आली आहे.
या व्यक्तींची सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड -
यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कारासाठी डॉ. समीर कुलकर्णी (नाटक- सोयरे सकळ), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारासाठी मंगेश कदम (नाटक- गुमनाम है कोई!), सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी सुमित राघवन (नाटक- हॅम्लेट), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी ऐश्वर्या नारकर (नाटक- सोयरे सकळ), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार पुरस्कारासाठी प्रदीप मुळये (नाटक- हॅम्लेट), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना पुरस्कारासाठी प्रदीप मुळये (नाटक- गुमनाम है कोई!), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत पुरस्कारासाठी अजित परब (नाटक- सोयरे सकळ), सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार पुरस्कारासाठी सचिन वारीक (नाटक- सोयरे सकळ), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कारासाठी सतीश राजवाडे (नाटक- अ परफेक्ट मर्डर), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी माधुरी गवळी (नाटक- एपिक गडबड), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कारासाठी आशिष पवार (नाटक- गलती से मिस्टेक), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री पुरस्कारासाठी नंदिता पाटकर (नाटक- आमच्या ‘ही’च प्रकरण) आणि विशेष लक्षवेधी पुरस्कारासाठी मधुरा वेलणकर (नाटक - गुमनाम है कोई!) यांची निवड करण्यात आली आहे.
सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक पुरस्कारासाठी ‘नाट्यसंपदा कला मंच’ संस्थेच्या ‘संगीत चि.सौ.कां. रंगभूमी’, सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता पुरस्कारासाठी विक्रांत आजगावकर (नाटक-संगीत संत तुकाराम), सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री पुरस्कारासाठी शमिका भिडे (नाटक- संगीत चि.सौ.कां. रंगभूमी) यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रंगकर्मींना नाटककार गोविंद बल्लाळ देवल स्मृतिदिनाप्रित्यर्थ १४ जूनला पुरस्कार देऊन सन्मानीत करते. त्यानुसार यावर्षीही मुंबईतील यशवंत नाट्यमंदीरात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल.