मुंबई -अनेक कलाकार भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतात. सलमान खान ने ‘सुलतान’ साठी तर आमिर खान ने ‘दंगल’ साठी वजन कमी-जास्त केले. ‘गजनी’ साठी तर आमिरने त्याचे केस एकदम बारीक कापले होते. मराठीमध्ये आता अजिंक्य देवनेही ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेतील भूमिकेसाठी आपल्या केसांना कात्री लावलीय. त्याने तर चक्क ‘चमनगोटा’ केलाय. थोडक्यात आपले मराठी कलाकार हिंदी कलाकारांच्या तुलनेत ‘केस’भरही मागे नाहीत.
भूमिकेसाठी केला ‘चमनगोटा’ सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक होतेय ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतून ज्यात ते बाजीप्रभू देशपांडेच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षकांमध्ये ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. बाजीप्रभू देशपांडे हे ऐतिहासिक पात्र साकारण्यासाठी अजिंक्य देव खूपच उत्सुक आहेत.स्टार प्रवाहवर भेटीला येणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ या शिवकालीन मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या शिलेदारांनी प्राणांची आहुती दिली त्या शिलेदारांच्या शौर्याला ही मालिका समर्पित आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव या मालिकेत बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत असून ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्य़ासाठी त्यांनी केसांना कात्री लावली आहे. अभिनयाच्या आजवरच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मी केसांना कात्री लावल्याचं अजिंक्य देव म्हणाले.
भूमिकेसाठी केला ‘चमनगोटा’ ‘एक अभिनेता म्हणून हा निर्णय घेणं माझ्यासाठी थोडं कठीण होतं. प्रेक्षकांना हा लूक आवडेल का याची भीती देखील होती. बाजीप्रभू देशपांडेंसारखं भव्यदिव्य व्यक्तिमत्व साकारायचं तर एवढा त्याग करणं गरजेचं होतं असं मला वाटतं. मात्र माझ्या या नव्या लूकला प्रेक्षकांनी पसंती दिलेली पाहून माझा निर्णय योग्य असल्याचं समाधान आहे. इतिहासावरच्या आणि छत्रपतींच्या प्रेमापोटीच हे शक्य झालं आहे’, अभिनेते अजिंक्य देव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्टार प्रवाह प्रस्तुत आणि दशमी क्रिएशन्स निर्मित ‘जय भवानी जय शिवाजी’ येत्या २६ जुलैपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -भास्कर जाधवांना अध्यक्षपदाचे वेध, महाविकास आघाडीत कलह?