मुंबई -मराठी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवत आहेत. आता मराठमोळा आदिनाथ कोठारे हा देखील बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो रणवीर सिंगसोबत आगामी '८३' या चित्रपटात क्रिके़टर दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
दिग्दर्शक कबीर खान हे १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वकरंडकाचा रंजक प्रवास आपल्या '८३' या चित्रपटात उलगडत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटात इतर क्रिकेटरच्या भूमिकेत कोणते कलाकार भूमिका साकरणार, त्यांची नावे जाहीर करण्यात आली होती.
'८३' या चित्रपटात माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सय्यद किरमानी यांच्या भूमिकेत आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी आणि सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. तर, आदिनाथच्या बरोबरीने चिराग पाटील हा त्याचेच वडील संदिप पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
आदिनाथ कोठारेने बालपणीच 'छकुला' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर 'झपाटलेला-२' चित्रपटातही त्याने मुख्य भूमिका साकारली होती.