मुंबई - शासनाने सांगितलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन करून, मराठी मालिका क्षेत्रातील चित्रीकरण सुद्धा सुरु करण्यात आलेले आहे. बाहेरील व्यक्तीला सेटवर येण्यास परवानगी नाही. तसेच सेटवरील कुणालाही बाहेर जाण्याची परवानगी नाही. या नव्या नियमांचा परिणाम म्हणून, एक वेगळेच वातावरण मालिकांच्या सेटवर पाहायला मिळत आहे.
'झी युवा' वाहिनीवरील मालिका, 'डॉक्टर डॉन' सुद्धा याला अपवाद नाही. या मालिकेचे नवीन भाग आता सुरू झाले आहेत. नव्या कार्यपद्धतीशी आणि वातावरणाशी सर्वच कलाकार मंडळी जुळवून घेत आहेत. मात्र, 'डॉक्टर डॉन'च्या सेटवरील सर्व कलाकारांना नुकतीच, एक झकास ट्रीट मिळाली आहे. अभिनेत्री श्वेता शिंदे हिने स्वतः केलेल्या पुऱ्या खाऊन सगळी मंडळी तृप्त झाली आहेत.
हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्तीची पाटण्यातही होऊ शकते चौकशी?
डॉक्टर डॉनची लाडकी डार्लिंग डीन, म्हणजेच आपली आवडती मोनिका स्वयंपाक करते आहे, असा एक सीन चित्रित करण्यात येत होता. या निमित्ताने, स्वयंपाकघरात शिरलेल्या श्वेताने सगळ्यांसाठी पुऱ्या तळायचं ठरवलं. सीनचं चित्रीकरण पूर्ण होताच, तिने खरोखरच पुऱ्या करायला सुरुवात केली. पुऱ्या खायला मिळणार म्हणून सगळीच मंडळी खूप खूश होती. सेटवरून मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता अनुराग वरळीकर सर्वाधिक खूश होता असं कळलं. खाण्याची आवड असल्यामुळे, त्याच्यासाठी ही ट्रीट खूपच खास ठरली. श्वेताची केशभूषा करणारी, तिची असिस्टंट सुद्धा या कामात तिच्या मदतीला होत्या..ऐन पावसाळ्यात गरमागरम पुऱ्या खायला मिळाल्याने संपूर्ण युनिटने ही अनोखी ट्रीट मस्त एन्जॉय केली.