मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार मल्टी टॅलेंटेड असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. अनेक मराठी अभिनेते-अभिनेत्री नृत्य, गायन, पेंटिंग्स, संगीत, लेखन इत्यादीमध्ये सुद्धा पारंगत आहे. उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून प्रेक्षकांसमोर आलेली प्राजक्ता माळी, नंतर अभिनेत्री म्हणूनही प्रेक्षकांची लाडकी बनली. आता तिच्यातील अजून एक गुण बाहेर आलाय, तो म्हणजे ती एक मनस्वी कवियत्री सुद्धा आहे. नुकतेच तिचा बहुभाषिक 'प्राजक्तप्रभा' हा काव्यसंग्रह एका छोटेखानी (कोविड प्रोटोकॉल्समुळे) समारंभात, नामांकितांच्या उपस्थितीत, प्रकाशित करण्यात आला.
या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार प्रवीण दवणे यांच्या हस्ते झाले. या वेळी अध्यक्षस्थानी 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अमृता खानविलकर, पुष्कर श्रोत्री आणि दिग्दर्शक अभिजित पानसे उपस्थित होते. या व्यतिरिक्त प्राजक्ताचे नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील मित्रपरिवारही तिला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता. या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणखी एक घोषणा करण्यात आली ती म्हणजे 'प्लॅनेट मराठी'चा भाग असणाऱ्या 'प्लॅनेट टॅलेंट'मध्ये प्राजक्ता माळीचा सहभाग. 'प्लॅनेट मराठी'च्या परिवारात सहभागी झाल्याबद्दल या परिवाराकडून प्राजक्ताला एक खास भेट देण्यात आली. तिचा बालपणीपासून आजवरचा प्रवास या वेळी व्हिडिओद्वारे दाखवण्यात आला. तर प्राजक्तासह उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी 'प्राजक्तप्रभा'चे काव्यवाचन केले.
प्राजक्ता माळीबद्दल 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले की, ''एक अभिनेत्री म्हणून ज्याप्रमाणे तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याप्रमाणेच एक कवयित्री म्हणूनही ती रसिकांचे प्रेम मिळवेल. मालिका, चित्रपट, नाटक अशा अभिनयाच्या विविध माध्यमांमधून प्राजक्ताने आपले अभिनयकौशल्य यापूर्वीच प्रेक्षकांना दाखवले आहे. आज ती 'प्लॅनेट मराठी'च्या परिवारात सहभागी होत आहे. 'प्राजक्तप्रभा' आणि 'प्लॅनेट टॅलेंट'च्या माध्यमातून प्राजक्ता एका नवीन प्रवासाची सुरुवात करत आहे. यासाठी तिला खूप शुभेच्छा. आम्हाला फार अभिमान आहे, अशी अष्टपैलू अभिनेत्री आमच्या परिवारात सामील होत आहे.''
प्राजक्ताचे नाव काढताच समोर येतात ती मंद सुगंधाची, मन प्रफुल्लित करणारी मोहक फुले. जुलै महिन्यात ही फुले बहरून येतात आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. अशाच प्राजक्तला साजेसे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक अशा विविध माध्यमांमधून तिने कायमच तिच्या कलाकृतीचा सुगंध सर्वत्र दरवळवत ठेवला आहे. आता प्राजक्ता एका नवीन प्रवासासाठी सज्ज झाली आहे. ग्रंथाली प्रकाशित 'प्राजक्तप्रभा' काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आली आहे.