कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनंतर मनोरंजनसृष्टी सावरतेय. सरकारकडून म्हणावी तेव्हडी मदत मिळत नसली तरी फिल्म इंडस्ट्रीतील मंडळी एकमेकांचा हात धरून सावरत आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनाला प्राधान्य देत टेलिव्हिजन वाहिन्या नवीन कार्यक्रम घेऊन येत आहेत. झी मराठीवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं असं’ असं या मालिकेचं नाव असून त्यात अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेचं कथानक नक्की काय असणार आहे आणि अमृतासोबत या मालिकेत अजून कोण कलाकार दिसणार आहेत ही सर्व माहिती अजून गुलदस्त्यात आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि पाहता पाहता या प्रोमोला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या प्रोमोमध्ये अमृता नवऱ्या मुलाकडील नातेवाईकांची नाव लक्षात ठेवताना दिसतेय. या प्रोमोने मालिकेबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.