कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन सदृश जनता कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळे चित्रपटगृहे बंद झाली तसेच कुठल्याही चित्रीकरणावर बंदी असल्यामुळे मनोरंजनसृष्टीवर पुन्हा एकदा अवकळा आली. त्यातल्या त्यात काही मालिका निर्माते महाराष्ट्राबाहेर जाऊन शूटिंग करू लागले व छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा स्रोत सुरु राहिला. महाराष्ट्रात किंबहुना मुंबईत सर्वात जास्त शुटिंग्स होत असतात व त्यामुळे अनेक निर्मितीसंस्थांच्या चित्रपटांचे काम अडकून पडले आहे. यातच रोजंदारीवर काम करणारे कामगार, छोट्यामोठ्या भूमिका करणारे सहकलाकार यांचे हाल सुरु असून तिकडे कोणीच लक्ष देत नाहीये. तसेच भले काही मालिका राज्याबाहेर चित्रित होत असतील परंतु निर्मात्यांनी मोजक्याच लोकांना तिथे नेलंय त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडालेत. आता तर प्रमुख अभिनेते-अभिनेत्री यांनादेखील लॉकडाऊनची झळ बसू लागलीय आणि त्यांनी नोंदणी केलेल्या फिल्म युनियन्सना यावर तोडगा काढण्यास सांगितले आहे.
बॉलिवूडमधील मोठमोठे स्टार्स परदेशात जाऊन शूटिंग करू शकतात परंतु हे सर्वांनाच शक्य नाही. त्यातच प्रमुख मुद्दा लाखो लोकांच्या रोजगाराचा आहे. त्यामुळे FWICE या सर्वात मोठ्या फिल्म युनियनने, जिचे मनोरंजनसृष्टीतील जवळपास सर्वच सभासद आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच एक पत्र पाठविले असून मनोरंजनसृष्टीलासुद्धा लवकरात लवकर काम सुरु करू देण्याची विनंती केली आहे. त्यांच्या पत्राचा स्वैर अनुवाद.....
‘आम्ही तुम्हाला अनेक पत्रांद्वारे विनंत्या केल्या की मनोरंजनसृष्टीलाही काम सुरु करण्याची मुभा द्यावी परंतु आपल्या ऑफिसमधून आमच्या एकाही पत्राला उत्तर देण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. FWICE आणि मनोरंजनसृष्टीची कोऑर्डिनेशन कमिटी यांनाही कुठल्याही प्रकारचा निर्णय कळविण्यात आलेला नाहीये.