मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का; कोरोनाग्रस्त अभिनेत्याने 'मी पुन्हा येईन' म्हणत सोडला प्राण - actor rahul vohra died due to corona
राहुल वोहरा अवघ्या ३५ व्या वर्षी हे जग सोडून गेला. त्याने समाज माध्यमांवर भाविनक पोस्ट टाकली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना टॅग केले होते.
साधारण वर्षभरापूर्वी ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगळ्या रीतीने कुप्रसिद्ध झाले होते. परंतु ‘मी पुन्हा येईन’ म्हणत एका कलाकाराने प्राण सोडले हे कष्टप्रद वाटतंय. अभिनेता आणि युट्युबर व सोशल इन्फ्लुएन्सर राहुल वोहरा हा कोरोनाचा अजून एक बळी ठरला आहे. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून त्यात अनेकांना कोरोनाची लागण होत असून बरेच जण यमदूताबरोबर पुढील प्रवासाला गेले आहेत. यात मनोरंजनसृष्टीही मागे नाही. कलाक्षेत्रातील अनेकांचा कोरोनाने बळी घेतला असून त्यात राहुल वोहराचे नाव दाखल झाले आहे.
उत्तराखंडमध्ये जन्मलेला राहुल वोहरा लहानपणापासूनच नाटकांतून अभिनय करत आला आणि त्याची हीच आवड त्याला दिल्ली सारख्या मोठ्या शहराकडे ओढून घेऊन गेली. थिएटर करता करता तो डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळला आणि युट्यूबवर अनोखे व्हिडीओज बनवू लागला आणि प्रसिद्ध झाला. या व्हिडीओजना १० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळालेत आणि फेसबुकवर त्याचे १९ लाख फॉलोअर्स होते. त्याची पत्नी ज्योती तिवारीसुद्धा अभिनेत्री असून ती त्याच्या व्हिडीओजसाठी लेखन करायची. तो अस्मिता थिएटर ग्रुपशी निगडित होता आणि तेथील गटप्रमुख आणि दिग्दर्शक अरविंद गौड हे तर राहुलच्या निधनाची बातमी ऐकून ढासळले. ते म्हणतात, ‘राहुल वोहरा गेला. माझा प्रतिभाशाली कलाकार कालवश झाला. कालच तो मला सांगत होता की त्याला अधिक चांगली ट्रीटमेंट मिळाली असती तर तो बरा होऊ शकला असता. आम्ही त्याला आयुष्मान हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले होते. परंतु आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. राहुल आम्ही तुझे गुन्हेगार आहोत. क्षमस्व.’
राहुल वोहरा अवघ्या ३५ व्या वर्षी हे जग सोडून गेला. त्याने समाज माध्यमांवर भाविनक पोस्ट टाकली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना टॅग केले होते, ‘मला पण चांगली ट्रीटमेंट मिळाली असती तर मी देखील वाचू शकलो असतो. मी पुन्हा येईन आणि अजून उत्तम कार्य करेन. आता मी हिम्मत हरलो आहे.’ राहुलला कोरोनाची लागण झाल्यावर दिल्लीतील ताहिरपूर येथील राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. चार दिवस ट्रीटमेंट घेऊनही त्याच्या प्रकृतीत सुधार येत नव्हता म्हणून त्याला द्वारका येथील आयुष्मान हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. परंतु कोरोनाशी लढता लढता राहुलचे निधन झाले.