महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 27, 2021, 8:14 PM IST

Updated : Jun 27, 2021, 8:39 PM IST

ETV Bharat / sitara

‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत अभिनेते कश्यप परुळेकर साकारणार नेतोजी पालकर

स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत अभिनेता कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारणार आहे.

Actor Kashyap Parulekar is excited to play a role Sardar Senapati Netaji Palkar in Jai Bhavani Jai Shivaji.
‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत अभिनेते कश्यप परुळेकर साकारणार नेतोजी पालकर

ऐतिहासिक मालिकांना मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून बऱ्याच नवीन ऐतिहासिक मालिका येऊ घातल्यात. ज्यात स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ही मालिका आहे. या ऐतिहासिक मालिकेत अभिनेता कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारणार आहे. नेतोजी पालकर हे स्वराज्याच्या लढ्यातलं एक महत्त्वपूर्ण नाव. त्यांना प्रतिशिवाजी असं देखिल म्हटलं जायचं. स्वराज्याच्या हितासाठी आणि शिवरायांवर असलेल्या निष्ठेपायी त्यांनी शत्रुच्या गोठात राहणं देखील स्वीकारलं. अशा या शूरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता कश्यप परुळेकर याने व्यक्त केली.

स्टार प्रवाहच्या या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना कश्यप म्हणाला, ‘ मी याआधी एक ऐतिहासिक सिनेमा केला आहे. त्यामुळे तलवारबाजी आणि घोडेस्वारी याच प्रशिक्षण घेतलं होतं. ज्याचा फायदा नेतोजी साकारताना होतो आहे. या भूमिकेसाठी लागणारा फिटनेस, एनर्जी, लवचिकता यावर मी मेहनत घेतोच आहे. सोबतच भाषेवरही मी विशेष लक्ष देतो आहे. नेतोजी साकारण्यासाठी घाटावरची भाषा आणि त्या भाषेचा लहेजा आत्मसात करतो आहे.’

स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “‘राजा असावा तर असा’ अशा छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. ती वर्णावी तेवढी थोडीच आहे. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती. ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. अशा शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका ‘जय भवानी जय शिवाजी’ सादर करताना अभिमान वाटतो आहे.”

कश्यप परुळेकर पुढे म्हणाला की, ‘माझं स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेपासून सुरु झालेला हा प्रवास अविरत सुरुच आहे. या मालिकेसाठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा मी लगेच होकार दिला. एकतर मालिकेची कल्पनाच फार वेगळी आहे. शिवरायांच्या शिलेदारांची गोष्ट मालिकेतून भेटीला येणार आहे. त्यामुळे नेतोजी पालकर साकारणं माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे. एक अभिनेता म्हणून या भूमिकेतून मी संपन्न होतोय असं म्हटलं तरी चालेल.’

स्टार प्रवाह प्रस्तुत ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची असून २६ जुलैपासून रात्री १० वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Last Updated : Jun 27, 2021, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details