महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 1, 2020, 6:58 PM IST

ETV Bharat / sitara

आषाढी वारीनिमित्त अभिनेता जितेंद्र जोशीने दिलं आगळं वेगळं विठु 'दर्शन'

विठ्ठल भेटीची आस लागलेल्या तमाम विठ्ठल भक्तांसाठी काही करता येईल का असा विचार करत आषाढी एकादशी दिवशी लाखो वारकऱ्यांसाठी सचिन बाळासाहेब सुर्यवंशी यांचं लिखाण असलेलं विठ्ठलाचं एक आगळंवेगळं 'दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी यांच्या सादरीकरणात कोल्हापूर फिल्म कंपनी घेऊन येत आहे.

Actor Jitendra Joshi
अभिनेता जितेंद्र जोशी

मुंबई - विठ्ठल भक्तांचा श्वास आणि ध्यास असणारी पंढरीची पायी वारी कोरोनामुळे यावर्षी थांबवावी लागली. विठ्ठला, जीवात जीव असेपर्यंत दरवर्षी पायी वारी करत तुझ्या दर्शनाला येईन असा विठ्ठलाला शब्द दिलेल्या वारकऱ्यांच्या काळजाचा जणू ठोकाच चुकला. या आषाढीला चंद्रभागेच्या तीरी झेंडा पताका फडकणार नाहीत, हरिनामाचा जयघोष होणार नाही, रिंगण होणार नाही, वारकऱ्यांना विठू माऊलीचं दर्शन घेता येणार नाही. याची देही याची डोळा विठ्ठलरूप मनात साठवता येणार नाही.

धांवोनियां आलो पहावया मुख । गेले माझे दुःख जन्मांतरिंचे ॥

ऐकिले ही होते तैसे चि पाहिले । मन स्थिरावले तुझ्या पायी II

तासनतास दर्शन रांगेत उभं राहून माऊलीचं दर्शन घेऊन मुक्ती अनुभवणारे आपले वारकरी. यावर्षी मात्र विठ्ठलाच्या वारकऱ्यांसाठीची आनंदाची पर्वणी अर्थात वारी आळंदीहून निघाली नाही. विठ्ठल भेटीची आस लागलेल्या तमाम विठ्ठल भक्तांसाठी काही करता येईल का असा विचार करत आषाढी एकादशी दिवशी लाखो वारकऱ्यांसाठी सचिन बाळासाहेब सुर्यवंशी यांचं लिखाण असलेलं विठ्ठलाचं एक आगळंवेगळं 'दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी यांच्या सादरीकरणात कोल्हापूर फिल्म कंपनी घेऊन येत आहे. तसेच 'दर्शन' ही कोल्हापूर फिल्म कंपनीच्या सचिन सुरेश गुरव यांची निर्मित, संकल्पना असून संकलन फैजल महाडिक यांनी केले आहे, पार्श्वसंगीत अमित पाध्ये यांनी दिले असून प्रथमेश रांगोळे यांच्या छायाचित्रणातून हे दर्शन आपल्याला घेता येणार आहे. असे हे विठ्ठलाचे आगळंवेगळे दर्शन ' सेवेच्या रुपात कोल्हापूर फिल्म कंपनी ' विठ्ठल भक्तांचरणी रुजू करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details