महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका ‘आई कुठे काय करते’ - Aaie Kute Kai Karate srial on Star Pravah

घरासाठी आयुष्यभर राबणाऱ्या या माऊलीचं महत्त्व पटवून देणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका स्टार प्रवाहवर २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे.

Aaie Kute Kai Karate
आई कुठे काय करते

By

Published : Dec 14, 2019, 5:07 PM IST

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणं अशक्य आहे. आपल्याआधी तिचा दिवस सुरू होतो. सर्वांच्या आवडी-निवडी, कामाच्या वेळा, थोरामोठ्यांची काळजी आणि घर जपताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे विसरते. तसं पाहिलं तर गृहिणीच्या कामाचं आणि तिच्या त्यागाचं कोणतंही मोल नसतं. घरातला प्रत्येकजण तिला गृहीत धरत असतो. एकाचवेळी आई, सून, मुलगी, पत्नी, वहिनी अशा अनेक जबाबदाऱ्या ती कोणतीही तक्रार न करता पार पाडत असते. तिच्या कामाचा मोबदला सोडाच पण साधं कौतुकही तिच्या वाट्याला येत नाही. घरासाठी आयुष्यभर राबणाऱ्या या माऊलीचं महत्त्व पटवून देणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे.

आईच्या भावविश्वाचा शोध घेणारी मालिका

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली २५ वर्ष संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आई हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अश्या विषयावर मालिका करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे कारण आई आपल्यासाठी किती करते हे आपल्या ध्यानीमनी नसतं. आपल्या आयुष्यातली ही सर्वात महत्त्वाची व्यक्ती जी आपल्यासाठी खूप काही करते पण त्याची जाणीव कधी करुन देत नाही. अशा या आईची गोष्ट मांडताना खूप अभिमान वाटतोय. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल याची मालिकेच्या टीमला खात्री आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details