कोरोना काळातही बऱ्याच मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताहेत. त्यांना मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे या मालिका यशाचे अनेक टप्पे पार करताहेत. नुकताच कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेने आज २५० भागांचा पल्ला गाठला. रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे ही मालिका हे यश पाहू शकली असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. या मालिकेची निर्मिती स्ट्रॉबेरी पिक्चर्सच्या बॅनरखाली मनवा नाईक हिने केली आहे. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत, सोशल डिस्टिंसिन्ग आणि योग्य ती काळजी घेत मालिकेचे शूट सुरू आहे.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमधील अक्षया नाईक, समीर परांजपे यांची जोडी प्रेक्षकांना भावतेय. त्याचबरोबर पूजा पुरंदरे, अतीशा नाईक, गौरी किरण, उमेश दामले, पूनम चौधरी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. मालिकेमधील लतिका आणि अभिमन्युची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे. या दोघांच्या सुखदु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली. आता मालिकेने २५० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही.