लग्न म्हटलं की त्यात दोन जीवांचं मिलन आलं, कुटुंबातील व्यक्तींचे जुळणारे नातेसंबंध आले, मानपान आला, बस्ता आला, रुसवे फुगवे आले आणि त्यासोबत आलं ते सर्व वयोगटातील लोकांना आवडेल असा भरपूर मसाला. त्यामुळे लग्नावर आलेले किंवा लग्नाभोवती पिंगा घालणारे सिनेमे, मग ते मराठी असो की हिंदी असो हमखास प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होतात. त्यातलाच एक नवा सिनेमा म्हणजे सबकुछ डॉ. सलील कुलकर्णी असलेला ‘वेडिंगचा शिनेमा’..
आता एकीकडे निवडणुका, दुसरीकडे आयपीएल, मुलांच्या संपलेल्या परिक्षा आणि नुकताच सुरू होऊ घातलेला लग्नांचा हंगाम याच सगळ्या धामधुमीत डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ रिलीज झालाय. रुढार्थाने हा सिनेमा लग्नाचा वाटत असला तरीही तो मुळचा लग्नाचा नाही, तर लग्न ठरून ते होईपर्यंत घडणाऱ्या घडामोडींचा सिनेमा आहे. आता कोणताही सिनेमा घडायला एक निमित्त लागतंच ‘वेडिंगचा शिनेमा’साठी हे निमित्त आहे प्री वेडिंग शूटचं...सध्या लग्नाच्या व्हिडिओपेक्षा प्री किंवा पोस्ट वेडिंगसाठी केली जाणारी फोटो किंवा व्हिडिओ शूटचा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय झालाय. सोशल मीडियावर अनेक जोडपी हे व्हिडिओ टाकताना आपण पाहतो. नेमका हाच व्हिडिओ शूट करताना घडणारी कथा सिनेमातून आपल्याला पहायला मिळते.
या लग्नात नवरदेव आहेत प्रकाश म्हणजेच अभिनेता शिवराज वायचळ तर नववधू आहे परी म्हणजेच नवोदीत अभिनेत्री ऋचा इनामदार. मुळची मुंबईची आणि व्यवसायाने डॉक्टर असलेली परी इटर्नशिपच्या निमित्ताने सासवडला येते. आणि मोबाईलचं सीमकार्ड घेण्यासाठी मोबाईलचं दुकान चालवणाऱ्या प्रकाशला भेटते. पहिली नजर में प्यार वगैरे होऊन हे दोघे घरच्यांना विश्वासात घेऊन लग्नाचा निर्णय घेतात आणि खऱ्या अर्थाने सिनेमा सुरू होतो. या दोघांच्या लग्नाची प्री वेडिंग फिल्म शूट करायची जबाबदारी येऊन पडते ती उर्वी म्हणजेच मुक्ता बर्वेवर, तिच्यासोबत तिचा अतिउत्साही कॅमेरामन मदन म्हणजेच भाऊ कदम आणि प्रकाशचा हरहुन्नरी मित्र मॅक म्हणजेच प्रवीण तरडेही असतो. हे सगळे मिळून ही युनिक फिल्म बनवायला सुरूवात करतात. दुसरीकडे प्रकाशच्या घरची मंडळी आई-वडिल शिवाजी साटम अलका कुबल-आठल्ये मोठा भाऊ संकर्षण कऱ्हाडे त्याची पत्नी, बारामतीची बहिण कल्पना म्हणजेच प्राजक्ता हणमधर अशी सगळी वऱ्हाडी मंडळीही असतातच. याशिवाय मुंबईतले डॉक्टर जोडपं म्हणजेच परीचे आई-वडील सुनील बर्वे आणि अश्विनी काळसेकर हेही यात इन होतात..अशी सगळी मंडळी प्री वेडिंगचा सिनेमा बनवता बनवता कसे एकमेकांना अधिक चांगल्या पद्धतीने कळत जातात. आणि त्यातून त्यांची नाती कशी परिपक्व होतात याच चित्रण म्हणजे हा सिनेमा आहे.
साधी सरळ पण नर्मविनोदी अशी सिनेमाची मांडणी-
सिनेमा लिहितानाच सलील यांनी त्यात नकारात्मकतेला मुळीच थारा दिलेला नाही. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर एकमेकांपेक्षा वेगळं असलं तरीही आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगणारं, प्रत्येकाच्या जगण्याला त्याच्या स्वभाव वैशिष्ठ्यानुसार वेगळा रंग आहे. सगळ्या आनंदी परिस्थितीत काहीसं विघ्न येतं ते मतभिन्नतेचं मात्र तो अडथळाही लांबण लागेल असं वाटत असतानाच सुटून जातो. सलील यांचा पहिलाच सिनेमा असला तरीही त्यांच्या दिग्दर्शनात कुठेही नवखेपणा दिसत नाही. याच क्रेडिट गेली काही वर्ष त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या म्युझिक व्हिडिओंना द्यावं लागेल. जी सहजता त्यांच्या स्वभावात आहे तीच त्यांच्या गोष्टीत आहे. त्यामुळे अनेक पात्र स्क्रिनवर आली तरिही ती गोंधळलेली वाटत नाहीत. साधी सरळ पण नर्मविनोदी अशी या सिनेमाची मांडणी आहे. कुठेही न रेंगाळता ती पुढे सरकत असल्याने कंटाळा आजिबात येत नाही. सलील स्वतः उत्कृष्ट संगीतकार असल्याने मोजकी पण कथेला पुढे नेणारी गाणी त्याने सिनेमात अचूक ठिकाणी टाकलीत. लग्नाची गाणी असली तरिही वेगळे प्रसंग निवडून ती संदीप खरेने मस्त लिहिलीत त्यामुळे ती प्रेक्षकांच्या ओठांवर चांगलीच रूळतात.
अलका कुबल-आठल्येंनी ग्लिसरीनचा वापर न केलेला पहिला सिनेमा-
अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर दोन व्यक्तींचा उल्लेख आवर्जून करावा लागेल, एक म्हणजे अलका कुबल-आठल्ये कारण अलका ताईंनी ग्लिसरिनचा वापर न करता केलेला हा एकमेव सिनेमा आहे. त्यांच्या खऱ्या आयुष्यातील सकारात्मकता ही या आईच्या भूमिकेला वेगळा कंगोरा मिळवून देते. तसंच वेगळेपण अश्विनी काळसेकर यांनी साकारलेल्या आईच्या भूमिकेलाही आहे. सिनेमा संपताना या दोन्ही भूमिका तुमच्या विशेष लक्षात राहतील. वेडिंगचा सिनेमाच्या पोस्टरवर शिवराज,ऋचा, मुक्ता, भाऊ हे दिसत असले तरीही हा सिनेमा काही फक्त त्यांचा नाही. तर या सिनेमातील काही पात्र ही त्या त्या सीनपुरती सिनेमाची हिरो आहेत. शिवाजी साटम, संकर्षण कऱ्हाडे हे प्रसंगानुरूप सीनमध्ये गंमत आणतात. त्यामुळे अभिनयाच्या बाबतीत सगळ्यांनीच आपापल्या लौकिकाला साजेशी कामं केलीत असं म्हणावं लागेल.
प्रत्येक सिनेमात काही तरी भव्य दिव्य नाट्य घडावं, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडाव्यात, आधी विरह मग मिलन असं काही असावं किंवा क्षणोक्षणी धक्क्यामागून धक्के बसावे असं तुमच्या मनात काही असेल तर हा ‘वेडिंगचा शिनेमा’ तुमच्यासाठी नाहीच असं समजा..कारण यातलं काहीच या सिनेमात घडत नाही. साध्या माणसांची ही साधी गोष्ट आहे. काहीजण त्याला सलील कुलकर्णींचा ‘हम आप के है कौन’ असंही म्हणतील. पण येत्या सुट्टीत सहकुटुंब सहपरिवार एका चांगल्या आणि नितळ सिनेमाचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर ती अपेक्षा हा ‘वेडिंगचा शिनेमा’ नक्की पूर्ण करेल यात शंका नाही.