आपल्याकडे नेहमी आई आणि मुलांचे भावविश्व रंगवणारे चित्रपट पाहायला मिळतात. मात्र, वडील आणि मुलाच्या नात्यावर चित्रपट काढण्याचं धाडस दाखवलं ते संजुबाबा म्हणजेच संजय दत्तने. त्याच्या निर्मितीगृहामध्ये 'बाबा' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटातून वडील आणि मुलाच्या नात्यातील अबोल विश्व अतिशय हृदयस्पर्शी रंगवण्यात आले आहे.
काय आहे कथा -
कोकणातल्या एका छोट्याशा गावात राहणारे एक त्रिकोणी सुखी आणि समाधानी कुटुंबाची ही कथा आहे. या कुटुंबात 'माधव' म्हणजेच दीपक दोबरीयाल, त्याची पत्नी आनंदी म्हणजे नंदिता पाटकर आणि त्यांचा ८ वर्षाचा मुलगा शंकर म्हणजे आर्यन हे तिघे राहत असतात.
माधवसाठी लहानग्या शंकरच्या आनंदाहून जगात दुसरी कोणतीही महत्वाची गोष्ट नाही. त्याला जत्रेला नेणं, त्याला आवडेल ते त्याला देणं, यातच या दोघांचा आनंद सामावलेला आहे. या सुखी कुटूंबाला दृष्ट तेव्हा लागते जेव्हा पुण्यातून कोकणात आलेले राजन देशपांडे आणि पल्लवी देशपांडे म्हणजेच अभिजित खांडकेकर आणि स्पृहा जोशी हे मूल आपलं असून ते आपल्याला परत द्या, अशी मागणी माधव आणि आनंदी यांच्याकडे करतात.
सुरुवातीला काहीसे बावचळलेले हे दोघे नंतर थोडे सावरतात. इथूनच सुरू होतो तो त्यांचा एक लढा... एकीकडे कोर्टात शंकर नक्की कुणाच्या ताब्यात जाणार याचा लढा तर कोर्टाबाहेर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये, यासाठी एका बापाने दिलेला लढा.. यामध्ये कोणाचा विजय होतो, शंकरचा अधिकार कोणाकडे जातो, यासाठी हा चित्रपट पाहणे आवश्यक आहे.
बॉलिवूड ते मराठी सिनेसृष्टी -
'ओंकारा', 'तनु वेडस मनु' या चित्रपटात दिसलेला दीपक दोबरीयल आणि 'बाबा' मध्ये दिसलेला दीपक दोबरीयाल यात बरंच अंतर आहे. या चित्रपटात दीपक पुर्णत: माधवच्या भूमिकेत समरसुन गेलेला पाहायला मिळतो. त्यामुळेच तो कमालीचा खरा वाटला आहे. नंदिता धुरीने त्याला तेवढीच समर्थ साथ दिली आहे. हा चित्रपट बाप मुलाच्या नात्याचा असला तरीही शंकरवर आईची माया नसते असे नाही. स्पृहा आणि नंदिता यांच्यातल्या कोर्टातल्या आवारातील सीनमध्ये त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.