मुंबई - कंगाना रनौत आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला 'जजमेंटल है क्या' चित्रपट आज प्रदर्शित झाला. शीर्षकापासून प्रमोशनपर्यंत हा सिनेमा सतत वादात राहिल्याने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशात आता मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीची एक निराळी कथा मांडणारा हा सिनेमा प्रदर्शित झाला.
चित्रपटाची कथा -
चित्रपटात कंगनानं बॉबी नावाची भूमिका साकारली आहे. बॉबी एक डबिंग आर्टीस्ट आणि मनोरूग्ण आहे. जी एखाद्या पात्राला आवाज देताना वास्तवातही त्या पात्रात जाते आणि त्याप्रमाणेच वागते आणि यामुळेच ती काही महिन्यांसाठी मनोरूग्णालयातही जाते. दरम्यान बॉबी केशव म्हणजेच राजकुमारकडे आकर्षित होऊ लागते. मात्र, केशव आधीच विवाहीत असतो. अशात अचानक एक दिवस केशवची पत्नी रीमाचा खून होतो. हा खून केशवनेच केला असल्याचं बॉबी पोलिसांना सांगते. मात्र, केशव बॉबी मनोरूग्ण असल्याचे सांगत हा खून तिनेच केला असल्याचे पोलिसांना सांगतो. आता हा खून नेमका कोणी केला? कोणत्या कारणासाठी केला? या सर्व प्रश्नांची उत्तर हवी असतील तर तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.
दिग्दर्शन आणि कथा -
चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन उत्तम साधलं आहे. बॉलिवूडच्या इतर मसाला चित्रपटांपेक्षा या चित्रपटाची कथा वेगळी आहे, जी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. मध्यांतरानंतर यात अनेक नवे ट्विस्ट येतात. चित्रपटात कमी पात्र आहेत. त्यामुळे राजकुमार आणि कंगनावरच अभिनयाची बहुतेक जबाबदारी आहे. अशात दोघांनीही ती उत्तम पद्धतीने पार पाडली असून त्यांचे अभिनय कौतुकास्पद आहेत.