मुंबई - काही आफ्रिकन आणि कॅरिबियन प्रांतांमध्ये प्रेतांना जादूटोणाद्वारे पुनरुज्जीवित केले जाते आणि ते माणसांना खाऊन टाकतात. त्यांना ‘झोंबी’ असं म्हटलं जातं. या झोंबींवर पाश्चात्य देशात बरेच चित्रपट बनले गेले परंतु हा ‘जॉनर’ मराठीमध्ये पहिल्यांदाच हाताळला जातोय. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार घेऊन आलाय ‘झोंबिवली’ जो प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. कोरोना उद्रेकामुळे बऱ्याच चित्रपटांच्या प्रदर्शनाचं वेळापत्रक बदलावं लागलं होतं ज्यात ‘झोंबिवली’ सुद्धा होता. पहिल्या लॉकडाऊन मध्ये शिथिलता आल्यावर या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आणि हा चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित होणार होता. कोरोनाची परिस्थिती चिघळल्यावर याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.
गेल्यावर्षी दिवाळीच्या आसपास प्रदीर्घ काळासाठी बंद असलेली चित्रपटगृहे प्रेक्षकांसाठी उघडण्यात आली परंतु ‘झोंबिवली’ च्या निर्मात्यांनी थांबणे पसंत केले आणि हा सिनेमा ४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होईल अशी घोषणा केली. गेल्या काठी आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळे त्यातही बदल होईल की काय असे वाटत असताना काही राज्यांतील सिनेमागृहे बंद करण्यात आली ज्यात महाराष्ट्रातील चित्रपटगृहांचा समावेश नव्हता. अनेक हिंदी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले परंतु मराठी चित्रपट प्रदर्शित होताहेत. प्रेक्षकांना मनोरंजित करण्याचा आत्मविश्वास असल्यामुळे ‘झोंबिवली’ च्या निर्मात्यांनी येत्या २६ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.
मराठीतला पहिला वहिला झोंबीपट ‘झोंबिवली’ ची प्रतीक्षा आता संपली असून येत्या २६ जानेवारीला आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने वैदेही परशुरामी, अमेय वाघ आणि ललित प्रभाकर यांचं त्रिकुट प्रेक्षकांना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची भव्यता आणि झोंबींची पहिली झलक या ट्रेलर मधून दिसून येते. गेल्या वर्षापासून प्रेक्षक मराठीतला पहिला वहिला 'झोम-कॉम' असलेला 'झोंबिवली' या चित्रपटाची वाट पाहत आहेत. चित्रपटाचा पहिला टिझर हा फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित झाला होता ज्याने प्रेक्षकांची उत्सुकता तर वाढवलीच पण त्याच बरोबर मराठी होत असलेल्या या प्रयोगाला उत्तम दाद ही दिली.