मुंबई - बॉलिवूडसाठी यंदाचं वर्ष हे अतिशय लाभदायक ठरलं आहे. सरत्या वर्षाला गुडबाय करून नववर्षाच्या स्वागतासाठी देखील बॉलिवूड सज्ज झालं आहे. यंदाच्या वर्षाप्रमाणेच काही धमाकेदार चित्रपट वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित होणार आहेत.
१. वॉर
कमाई - 318 कोटी
२ ऑक्टोंबर २०१९ साली प्रदर्शित झालेल्या 'वॉर' चित्रपटाने यंदा बॉक्स ऑफिसच्या इतिहासात विक्रम रचला. अनेक विक्रम मोडत हा चित्रपट यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची जोडी पहिल्यांदा या चित्रपटात एकत्र झळकली. दोघांच्या अॅक्शनने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली.
२. कबीर सिंग
कमाई -२७८.२४ कोटी
शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांची मुख्य जोडी असलेला 'कबीर सिंग' हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद लाभला. यावर्षीचा हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला.
३. उरी - द सर्जिकल स्ट्राईक
कमाई - २४४.०६ कोटी
'हाऊझ द जोश' हा डायलॉग सिनेमागृहासोबतच प्रेक्षकांमध्ये गाजवणारा 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच ११ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. २०१६ साली उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर हा चित्रपट आधारीत होता. विकी कौशलची लोकप्रियता या चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
४. भारत
कमाई -२०९.३६ कोटी
सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची जोडी असलेला 'भारत' चित्रपट ५ जून २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. या दोघांसोबत सुनील ग्रोवरचीही यामध्ये मुख्य भूमिका होती. 'ईद'च्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
५. हाऊसफुल ४
कमाई - २०६ कोटी
अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सेनॉन, क्रिती खरबंदा आणि पुजा हेगडे यांची मुख्य भूमिका असलेला 'हाऊसफुल ४' हा चित्रपट यावर्षी २५ ऑक्टोंबरला प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला आहे.
६. मिशन मंगल
कमाई - २०० कोटी
मल्टीस्टारर 'मिशन मंगल' हा चित्रपट १३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांनाचं मंगळ मिशनमध्ये असलेल्या योगदानावर आधारित हा चित्रपट होता. यामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, क्रिती कुल्हारी, शरमन जोशी यांच्या भूमिका पाहायला मिळाल्या.
७. टोटल धमाल
हा चित्रपट देखील मल्टीस्टारर होता. २२ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अजय देवगन, माधुरी दिक्षित, अनिल कपूर, रितेश देशमुख यांच्यासोबत इतरही बऱ्याच कलाकारांच्या यामध्ये भूमिका पाहायला मिळाल्या. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
८. केसरी
कमाई - १५३ कोटी
अक्षय कुमारचा 'केसरी' चित्रपट २१ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. १८९७ साली सारागढी येथे झालेल्या लढाईवर हा चित्रपट आधारित होता. यामध्ये त्या २१ सैनिकांची कथा दाखवण्यात आली ज्यांनी १० हजार अफगानी सैनिकांचा सामना केला होता.
९. छिछोरे
कमाई - १५०.३६ कोटी
सुशांत सिंग राजपुत आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'छिछोरे' हा चित्रपटही यंदा सुपरहिट ठरला. कॉलेजवयीन विद्यार्थ्यांवर आधारित असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली.
१०. गली बॉय
कमाई -१४९.३१ कोटी
रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा 'गली बॉय' हा चित्रपटही यंदा चर्चेत राहिला. ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाला नामांकनही मिळाले होते. मात्र, अलिकडेच ऑस्करच्या शर्यतीतून हा चित्रपट बाहेर पडला आहे. मुंबईतील रॅपर्सच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटाला बरेच पुरस्कारही मिळाले आहेत.